MNS Protest Against Rise In Toll: राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिक उतरले रस्त्यावर; विना टोल वाहने सोडणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड

राज ठाकरेंनी जाळपोळीची भाषा केल्याने आता पोलिसांसमोर वाहतूक सुरळीत ठेवण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्याचही काम आहे.

Raj Thackeray | (Photo Credit - Twitter)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) टोलनाक्यावरून पुन्हा आक्रमक झाल्यानंतर आता राज्यात वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. मुंबई मध्ये आज पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची एक जुनी क्लिप दाखवली आहे. ज्यात त्यांनी लहान खाजगी वाहनांना टोलमुक्त केल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या याच क्लिपचा दाखला घेत मनसे कार्यकर्ते काही टोलनाक्यावर पोहचले आहेत. त्यांनी चालकांना क्लिप दाखवत टोल न देता गाडी पुढे नेण्यास सहमती मिळवली. पण यावरून आता पोलिसांची धावपळ सुरू आहे.

पोलिसांनी कायदा सुवस्था बिघडू नये म्हणून टोल नाक्यांकडे धाव घेतली आहे. दहिसर टोल नाक्यांवर लहान वाहनांकडून टोल वसुली सुरू असल्याने मनसे कार्यकर्तेही पोहचले. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. काही मनसे कार्यकर्ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. नक्की वाचा: MNS Against Toll Rise: देवेंद्र फडणवीसांचा जुना व्हिडीओ दाखवत मनसैनिकांकडून वाहनं विनाटोल सोडण्यास सुरुवात.

राज ठाकरेंची टोलनाक्यावर भूमिका काय?

राज ठाकरे टोलप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. जर देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्यानुसार लहान खाजगी वाहनांना टोल नसल्यास तो घेतला जाऊ नये. मनसे कार्यकर्ते टोल नाक्यावर असतील. जर संघर्ष झाला तर टोल नाके जाळण्याची भाषाही आज राज ठाकरेंनी वापरली आहे.

राज ठाकरेंनी जाळपोळीची भाषा केल्याने आता पोलिसांसमोर वाहतूक सुरळीत ठेवण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्याचही काम आहे. मुंबईच्या प्रवेश द्वारावर 1 ऑक्टोबर पासून टोलवाढ करण्यात आल्याने आता मनसे आक्रमक झाली आहे. ठाण्यात याप्रश्नी अविनाश जाधव यांनी उपोषण देखील केले आहे. काल राज ठाकरेंनी मनसे च्या अविनाश जाधव यांचे उपोषण मागे घेतले आहे.