Raj Thackeray Nashik Tour: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा तीन दिवसांचा नाशिक दौरा, शहरात पक्षाचा संघटनात्मक आढावा घेणार
19 ते 21 मे च्या दरम्यान ते नाशिकमध्ये तळ ठोकून असणार आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील नेत्यांना बळ देण्यासाठी आणि पक्षाची संघटनात्मक आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे नाशिक (Nashik) शहराच्या दौऱ्यावर आहेत. मनसेचे इंजिन देखील रुळावर येण्यासाठी चांगलाच जोर देत आहे. एकीकडे मनसेचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकवर मनसेने (MNS) पुन्हा एकदा नवनिर्माण करण्याचे ठरवल्याचे मागील काही बैठकांवरुन दिसून येत आहे. याच नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जोश भरण्यासाठी राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. 19 ते 21 मे च्या दरम्यान ते नाशिकमध्ये तळ ठोकून असणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपुर्वी आता लवकरच महापालिकेच्या निवडणुका होतील असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे ते संघटनात्मक आढावा घेणार आहेत. राज ठाकरे यांना नाशिक महापालिकेत सर्वप्रथम 2012 ते 2017 सत्ता मिळाली होती. तसेच 2009 मध्ये नाशिकमधून तीन आमदार निवडून आले होते. त्यामुळेच आता राज यांनी पुन्हा नाशिकमध्ये लक्ष घातले आहे.
आज संध्याकाळच्या सुमारास राज ठाकरेंचं नाशिक शहरात आगमन होणार आहे. या दौऱ्यात राज ठाकरे शाखाध्यक्ष आणि स्थानिक कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. याच सोबत शेतकरी संघटनेसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची देखील राज ठाकरे भेट घेणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मनसे नेते पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे काय आदेश देतात याकडे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर उद्या राज ठाकरेंची नाशिकमध्ये पत्रकार परिषद देखील घेणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शहराध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर नवीन शहराध्यक्ष राज ठाकरे नेमणार का याकडे ही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.