उद्धव ठाकरे खरंच BEST CM; कोकण दौऱ्यावरुन MNS चा उपहासात्मक टोला
विरोधकांनी आपल्या शैलीत याचा चांगलाच समाचार घेतला. यात आता मनसेने देखील उडी घेतली आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) झालेल्या नुकसानाची पाहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल कोकण दौरा केला. साधारपणपणे अर्ध्या दिवसांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांची पाहाणी करुन मुख्यमंत्री मुंबईला परतले. लवकरच पंचनामे करुन मदतही जाहीर करु, असे आश्वासनही त्यांनी दिले. मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेला कोकण दौरा विरोधकांनाही काही रुचला नाही. विरोधकांनी आपल्या शैलीत याचा चांगलाच समाचार घेतला. यात आता मनसे (MNS) ने देखील उडी घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी 'मुख्यमंत्री साहेब तुम्ही खरंच बेस्ट सीएम आहात', असा उपहासात्मक टोला लगावला आहे.
"चक्रीवादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरंच बेस्ट सीएम. आम्हाला तुमचा अभिमान आहात", या शब्दांत संदीप देशपांडे यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर टीका केली आहे. (पंतप्रधानांना गुजरात आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई पुढे काही दिसत नाही; मनसेची टीका)
संदीप देशपांडे ट्विट:
यापूर्वी भाजप नेते राणे बंधुंनी मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर टीका केली होती. 'लिपस्टिक दौरा' असे नितेश राणे आणि 'मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणे', असे निलेश राणे यांनी म्हटले होते. तर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी देखील यावरुन जोरदार टीका केली होती.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी देखील दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. 'जमिनीवरुन परिस्थितीची पाहाणी करतोय, हेलिकॉप्टरमधून नाही', असं म्हणत मोदी आणि 'विरोधीपक्षासारखा मी वैफल्यग्रस्त नाही' असं म्हणत फडणवीसांवर निशाणा साधला होता.