मनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला, विधानसभेच्या कामांसाठी हालचाली सुरु

या भेटीमध्ये राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

Raj Thackeray and Sharad Pawar (Photo Credits-Facebook)

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता विधानसभेच्या कामांसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी  (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

तर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी निवडणूरक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र राज ठाकरे यांनी राज्यात विविध ठिकाणी त्यांनी प्रचारसभा घेतल्या. तसेच राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रचारसभेचा फायदा अन्य पक्षाला होत असल्यास काहीही हरकत नाही असे म्हटले होते. तसेच देशात नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोन व्यक्ती पुन्हा एकदा सत्तेत नको अशी टीका त्यांनी केली होती. (इगतपुरी येथील तोडफोड प्रकरणात राज ठाकरे यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता)

सध्या राजकीय पक्षांतरामुळे वातावरण तापत चालले आहे. तर दुसरीकडे विविध राजकीय पक्षाकडून विधासभेची तयारी केली जात आहे. तर राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये झालेल्या भेटीत मनसे पक्षाला काँग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षांच्या आघाडीत घेण्यावरुन ही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली.

यापूर्वी सुद्धा राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पुन्हा एकदा राज आणि शरद पवार यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत यंदाच्या विधानसभा निवडणूकीबद्दल चर्चा झाल्याने कोणता नवा खुलासा होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.