MNS In BMC Eelection 2022: परप्रांतियांचा मुद्दा कायम, मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांची मनसे 'एकला चलो रे’

तसेच, हिंदुत्वाच्या मुद्दायवर ‘एकला चलो रे’ भूमिका घेऊन आपला पक्ष निवडणूक लढवेन असे मनसे (MNS) नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी म्हटले आहे.

Bala Nandgaonkar | (Photo Credits: Facebook)

मुंबई महापालिका निवडणूक 2022 डोळ्यासमोर ठेऊन चुचकारु पाहणाऱ्या भाजपला मनसेने स्पष्ट संकेत दिले आहेत. मुंबई महापालिका निवडणूक 2022 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला परप्रांतियांचा मुद्दा कायम ठेवणार आहे. तसेच, हिंदुत्वाच्या मुद्दायवर ‘एकला चलो रे’ भूमिका घेऊन आपला पक्ष निवडणूक लढवेन असे मनसे (MNS) नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी म्हटले आहे. ते सांगली येथे पदवीधर निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. भविष्यात हिंदुत्त्वाचा मुद्दा हा मनसेचा प्रमुख अजेंडा असणार आहे. परंतू, मनसे परप्रांतियांचा मुद्दा सोडणार नसल्याचेही नांदगावकर यांनी म्हटले आहे. मनसेसोबत युती करायला भाजप इच्छूक आहे. परंतू, मनसेने परप्रांतियांचा मुद्दा सोडायला हवा, असे भाजपकडून वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नुकतेच विधान केले होते की, मुंबई विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढायची ही भाजपची आजची भूमिका आहे. परंतू, मनसेसोबत युती करायची किंवा नाही हा निर्णय त्या त्या वेळी घेतला जाईल. भाजपचे धोरण स्पष्ट आहे. भाजपसोबत युती करायची तर मनसेला परप्रांतियांचा मुद्दा सोडावा लागेल, असे दरेकर यांनी म्हटले होते.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही मागे एकदा भाजप मनसेसोबत युती करु शकतो. परंतू, मनसेला काहीशी अधिक व्यपक भूमिका स्वीकारावी लागेल. त्यासाठी मनसेला परप्रांतियांचा मुद्दा सोडावा लागेल, असेही पाटील यांनी म्हटले होते. शिवाय शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यानंतरच शिवसेना अधिक मोठ्या प्रमाणावर विस्तारली अशी आठवणही पाटील यांनी मनसेला करुन दिली होती.

दरम्यन, प्रताप सरनाईक यांची ईडीने केलेल्या चौकशीबाबतही नांदगावकर यांनी भाष्य केले. ईडीची चौकशी ही सूडाची कारवाई असली तरीसुद्धा सरनाईक यांनी त्याला सामोरे जायला हवे. या आधी राज ठाकरे, शरद पवार आदी नेत्यांनाही ईडीच्या नोटीसा आल्या आहेत. या चौकशीला ते सामोरे गेले आहेत, असे नांदगावकर यांनी म्हटले.