Video: राज ठाकरे यांनी दिले उत्तर आणि सुरु झाली शिवसेना-मनसे युतीबाबत पुन्हा एकदा चर्चा
या मुलाखतीत राज ठाकरे यांनी शिवसेना-मनसे युती करुन एकत्र येईल का, या प्रश्नासह विविध मुद्द्यांवर मनमोकळी उत्तरं दिली. नोटबंदी, जीएसटी, काळा पैसा, मेक इन इंडिया यांसारख्या असंख्य मुद्द्यांवरुन निर्माण झालेल्या समस्या आणि प्रश्नांची उत्तरे सरकार देत नसल्याचेही राज ठाकरे यांनी या वेळी सांगितले.
Raj Thackeray Interview With Vinod Dua: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नेहमीच उत्सुकतेचा विषय राहिलेल्या शिवसेना-मनसे युती (MNS Alliance With Shiv Sena) होईल का? या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे. एका मुलाखती दरम्यान विचारलेल्या प्रश्नाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलेल्या उत्तरामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. ख्यातनाम पत्रकार विनोद दुआ (Vinod Dua) यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी शिवसेना-मनसे युती करुन एकत्र येईल का, या प्रश्नासह विविध मुद्द्यांवर मनमोकळी उत्तरं दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना भविष्यात शिवसेना पक्षासोबत युती करणार का? असा थेट सवाल विनोद दुआ यांनी राज ठाकरे यांना विचारला असता, 'इतक्यात तरी आम्ही एकत्र येण्याची चिन्हे नाहीत. पण, भविष्याचे कोणी सांगितले आहे. भविष्यात काहीही होऊ शकते', असे राज ठाकरे यांनी म्हटले. पंतप्रधान होण्या आगोदरचा माणूस (नरेंद्र मोदी) पंतप्रधान पदावर आल्यावर इतका बदलू शकतो तर, भविष्यात काहीही होऊ शकते असे सांगत शिवसेना-मनसे युतीबाबत अनिश्चित मात्र सकारात्मक संकेत राज ठाकरे यांनी दिले. मात्र, विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज यांनी आपल्या खास शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टोला लगावला.(राज ठाकरेंचं ‘लाव रे तो व्हिडिओ' वाक्य नेटकऱ्यांच्या हिटलिस्टवर, पहा व्हायरल मिम्स)
दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपला बहुमत मिळाले नाही. परंतू, भाजप संख्याबळाच्या तुलनेत क्रमांक एकचा पक्ष ठरला तर, नितीन गडकरी, सुषमा स्वराज यांना पंतप्रधान झालेले आवडेल काय? या प्रश्नाला थेट उत्तर देणे राज ठाकरे यांनी खुबीने टाळले. परंतू, भाजप संख्याबळानुसार जरी मोठा पक्ष ठरला तरी नितीन गडकरींना संधी द्यायला हवी ना,असेही ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे आणि विनोद दुआ यांची हीच ती मुलाखत
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही. मात्र, दिशाभूल करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या जातात असे सांगतानाच नोटबंदी, जीएसटी, काळा पैसा, मेक इन इंडिया यांसारख्या असंख्य मुद्द्यांवरुन निर्माण झालेल्या समस्या आणि प्रश्नांची उत्तरे सरकार देत नसल्याचेही राज ठाकरे यांनी या वेळी सांगितले.