Raj Thackeray and BJP: 'धनुष्यबाण' झाला, घड्याळ आले, तरीही 'कमळ' 'इंजिन'मागे धावले? महायुतीत असे का व्हावे?
खरे तर निवडणूक जिंकायची म्हटले की, मोठ्या आत्मविश्वासाने रिंगणात उतरणारा भाजपा (BJP) पाठिमागील 10 वर्षात प्रथमच इतका गळपटलेल्या आवस्थेत दिसत आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) भाजपसोबत हातमिळवणी करत महायुतीचा घटक पक्ष होणार का? याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. खरे तर निवडणूक जिंकायची म्हटले की, मोठ्या आत्मविश्वासाने रिंगणात उतरणारा भाजपा (BJP) पाठिमागील 10 वर्षात प्रथमच इतका गळपटलेल्या आवस्थेत दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेत असलेले भाजप प्रणित एनडीए सरकार भक्कम असताना महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये भाजपला स्वबळावर अद्यापही पाय रोवता आले नाहीत. परिणामी लोकसभा निवडणूक 2024 ला सामोरे जात असताना भाजप अनेक पक्षांशी युती करु लागला आहे.
राजकीय पक्षांची फोडाफोडी भाजपला पावली नाही?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर सत्तेत आलेली शिवसेना, त्यावरही समाधान झाले नाही म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घेऊन स्थापलेली महायुती भाजपला अजूनही फलदायी ठरत नसल्याचे दिसते. त्यातूनच मग आता राज ठाकरे यांच्या रुपात महायुतीमध्ये (Mahayuti) नाव घटक पक्ष सोबत घेण्याच्या आलचाली सुरु झाल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, Raj Thackeray: भाजप-मनसे युतीच्या हालचालीला वेग, राज ठाकरे दिल्लीला रवाना)
राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बैठक
राज ठाकरे सध्या दिल्ली येथे दाखल झाले असून त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एक बैठक पार पडणार आहे. भाजप सरचिटणीस विनोद तावडे हे स्वत: दिल्ली येथे ठाकरे यांना घेऊन शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमके काय घडते याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. भाजपच्या नियम अटी राज टाकरे मान्य करतात का आणि त्यासोबतच राज ठाकरे यांच्या मागण्यांवर भाजप सहमत होणार का यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. दुसऱ्या बाजूला भाजप आणि मनसे यांचे कार्यकर्ते ही संभाव्य युती स्वीकारणार का? याबाबतही चाचपणी करुन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Vasant More Quits MNS: मनसेचे फायरब्रॅन्ड नेते वसंत मोरे यांचा राज ठाकरे यांना राजीनामा देत 'जय महाराष्ट्र'!)
राज ठाकरे का?
भाजपला राज ठाकरे यांचा महायुतीमध्ये समावेश व्हावा असे वाटते आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पावर यांच्याबाबत जनतेमध्ये प्रचंड सहानुभूती आहे. त्यामुळे 'ठाकरे ब्रँड' सोबत असलेली सहानुभूती कमी करायची तर त्यासाठी ठाकरे नावाचाच दुसरा ब्रँड मैदानात उतरवायला हवा, हे भाजपला पुरते ठावूक आहे. परिणामी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात राज ठाकरे यांनाच मैदानात उतरविण्याची खेळी भाजपा खेळण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये खडाखडी?
दरम्यान, राज ठाकरे यांची महायुतीमध्ये होणारी संभाव्य एण्ट्री शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कितपत रुचणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे भाजपही सावध पावले टाकताना दिसत आहे. राजकीय वर्तुळात काहीही चर्चा असली तरी राजकारणामध्ये कधीही काहीही घडू शकते. त्यामुळे अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या बैठकीत नेमके काय घडते, ठरते यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.