MLC Elections: विधानपरिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणुका जाहीर; भाजपपुढे 'या' जागा राखण्याचे मोठे आव्हान

नागपूर, पुणे व औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

Maharashtra Legislature | (Archived images)

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी (MLC Elections) निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केली आहे. नागपूर, पुणे व औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तीन पदवीधर व दोन शिक्षक मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांचा कार्यकाळ 19 जुलै रोजी संपला होता. परंतु, कोरोना संसर्गामुळे सुमारे 5 महिने ही निवडणूक लांबणीवर पडली होती. कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवल्यानंतर राज्यातील ही पहिलीच निवडणूक असून या निमित्ताने महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) असा जंगी सामना रंगण्याची चिन्हे आहेत. निवडणूक होत असलेल्या पदवीधरच्या तीन पैकी दोन जागा सध्या भाजपकडे आहेत. तसेच भाजपसमोर या जागा राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

ही निवडणूक औरंगाबाद, नागपूर आणि पुणे पदवीधर मतदार संघ तर अमरावती आणि पुणे शिक्षक मतदार संघासाठी होईल. यापूर्वी भाजप-शिवसेना सोबत होते. पण, यंदा भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे तीन पक्ष पाहायला मिळतील. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागूले आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विधान परिषदेसाठी 12 नावे ठरली आहेत, परंतु ती गुपित आहेत. हे देखील वाचा- Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत काही पक्षांकडून राजकीय षडयंत्र केले जात आहे; अशोक चव्हाण यांचा आरोप

दिवाळीच्या उत्सवात निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी होईल. 12 नोव्हेंबर रोजी नामांकनासाठी अखेरचा दिवस आहे. तर, 13 तारखेला छाननी होऊन 17 तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यानंतर 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होणार आहे.