Maha Vikas Aghadi: महाविकासआघाडीतील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर; काँग्रेसमध्ये अनागोंदी, शिवसेनेचा मंत्री नॉट रिचेबल

एकूण 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात उतरल्याने विधानपरिषदेसाठी निवडणुक लागली. अत्यंत चुरशीच्या अशा झालेल्या या निवडणुकीत मविआतील काँग्रेस उमेदवाराचा धक्कादायक पराभव झाला.

Maha Vikas Aghadi | (Photo Credits: ANI)

विधानपरिषद निवडणूक 2022 (Maha Vikas Aghadi) मध्ये झालेल्या पराभवामुळे महाविकासआघाडीतील (Maha Vikas Aghadi) पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. एकूण 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात उतरल्याने विधानपरिषदेसाठी निवडणुक लागली. अत्यंत चुरशीच्या अशा झालेल्या या निवडणुकीत मविआतील काँग्रेस उमेदवाराचा धक्कादायक पराभव झाला. विशेष म्हणजे शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि समर्थक आमदार आणि अपक्ष अशा आमदारांची साथ असतानाही महाविकासआघाडीच्या आमदारांचा पराभव झाला. भाजपने संख्याबळ नसतानाही आपला आकरावा उमेदवार निवडून आणला. त्यामुळे आता मविआतच पक्षांतर्गत वाद जोरदार पाहायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागताच शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल आहेत. तर काँग्रेसमध्येही जोरदार धुसफूस सुरु आहे.

विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटींग झाले. परिणामी मविआ उमेदवाराचा पराभव झाला. या धक्क्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (21 जून) दुपारी 12 वाजता शिवसेनेच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. सर्व आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, शिवसनील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेले एकनाथ शिंदे हेच आता नॉट रिचेबल असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे.

विधानपरिषद निवडणूक 2022 निकाल

राष्ट्रवादी काँग्रेस - रामराजे नाईक निंबाळकर (विजयी) , एकनाथ खडसे (विजयी)

शिवसेना – सचिन अहिर (विजयी), आमशा पाडवी (विजयी)

भाजप- प्रवीण दरेकर (विजयी), श्रीकांत भारतीय (विजयी), राम शिंदे (विजयी), उमा खापरे (विजयी), प्रसाद लाड (विजयी)

काँग्रेस- भाई जगताप (विजयी), चंद्रकांत हंडोरे (पराभूत)

ट्विट

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे विधिमंडळ नेता बाळासाहेब थोरात यांनी दिलेली प्रतिक्रिया फार बोलकी होती. मविआतील घटक पक्षांची मते काँग्रेसला मिळाली नाहीत का? असे विचारले असता घटकपक्षांची काय आम्हाला आमचीच मते मिळाली नाहीत असं दिसतंय. आमची पहिल्या क्रमांकाची मतं आम्हाला मिळाली नाहीत. म्हणजे ती बाजूला गेली आहेत. ही मते नेमकी कुठे गेली, कशी गेली हा विषयच वेगळा आहे. तरीसुद्धा विधिमंडळ काँग्रेसचा नेता या नात्याने मी ही जबाबदारी स्वीकारतो. आमची भावना मी दिल्लीला कळवणार आहे. आम्हाला सरकार म्हणूनही विचार करावा लागेल. आम्ही आमच्या मित्रपक्षांशी चर्चा करुन नेमकी काय दुरुस्ती केली पाहिजे यावर चर्चा करु, असे थोरात यांनी म्हटले आहे.