Mission Begin Again: मुंबई शहरात येत्या 5 ऑगस्टपासून सर्व दुकाने, मॉल्स सुरु; मद्यविक्रीस परवानगी, वेळही ठरली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लॉकडाऊन जसा हळूहळू टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आला, त्याच पद्धतीने तो हटवण्यातही येईल असे सांगितले होते. त्यादृष्टीने पावले पडत असल्याचे दिसते आहे.

Mumbai | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मुंबई (Mumbai) शहरात येत्या पाच ऑगस्टपासून रस्त्यांच्या दुतर्फा असलेली सर्व दुकाने सुरु राहणार आहेत. यासोबतच मद्यविक्रीची दुकानेही (Liquor Shops) पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने (BMC) दिली आहे. महापालिकेने दिलेल्या माहितनुसार, येत्या पाच ऑगस्टपासून मुंबईतील सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या कालावधीत सुरु राहतील. प्रदीर्घ काळ लॉकडाऊनचा सामना केलेल्या मुंबईकरांसाठी महापालिकेने या निर्णयातू मोठा दिलासा दिला आहे. मुंबईत राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन (Mission Begin Again) खऱ्या अर्थाने सुरु केले असे बोलले जात आहे.

महापालिकेने मध्यविक्री दुकानांबाबत म्हटले आहे की, शहरातील मद्यविक्री दुकानेही सकाळी 9 ते सायंकाळी 7 या कालावधीत सुरु राहतील. तसेच, मद्यविक्रेत्यांना मद्याची घरपोच सेवाही देता येणार आहे. मात्र, राज्य सरकारने ही मुभा दिली असली तरी, केंद्र सकारने दिलेले आदेश आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियमही मद्यविक्रेत्यांना पाळावे लागणार आहेत. मद्यविक्री करणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याने नियम, कायदा, अटींचा भंग केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असेही मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, रस्त्यांवरील दुकाने, मद्यविक्री दुकाने यांसोबतच शहरातील मॉल्स, कॉम्प्लेक्समधली दुकानं सुरु करण्यासही पालिकेने संमती दिली आहे. मात्र, मॉल उघडले तरी मॉलमधील थिएटर्स मात्र बंद राहणार आहेत. यासोबतच फूड कोर्ट, रेस्तराँ, हॉटेल्स या सगळ्यांना होम डिलिव्हरी करता येणार आहे. (हेही वाचा, Unlock 3: आरोग्य मंत्रालयाकडून 5 ऑगस्ट पासून जीम, योगा सेंटर सुरू करण्यासाठी नियमावली जारी)

दरम्यान, मुंबई महापालिकेने दुकाने सुरु करण्यास परवानगी तर दिली. मात्र, मुंबईची वाहिनी अशी ओळख असलेली लोकल ट्रेन मात्र कधी सुरु होणार याबाबत उत्सुकता कायम आहे. अर्थात, मुंबई लोकल ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्याबाबत अद्याप तरी वाट पाहावी लागणार आहे. मात्र, बेस्ट बसेसही अद्याप पूर्णपणे सुरु झाली नाही. शहरातील बेस्ट सेवा ही मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येते.

कोरोना व्हायरस संकटातून सावरण्यासाठी आणि लॉकडाऊन प्रक्रिया संपुष्टात आणत पुन्हा एकदा नव्याने उभारी घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशिल आहे. या प्रयत्नांचाच भाग म्हणून महाराष्ट्र सरकार एक एक पाऊल पुढे टाकत अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लॉकडाऊन जसा हळूहळू टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आला, त्याच पद्धतीने तो हटवण्यातही येईल असे सांगितले होते. त्यादृष्टीने पावले पडत असल्याचे दिसते आहे.