मंत्री जयंत पाटील यांनी घेतली कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांची भेट; जाणून घ्या कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा

यंदाही पश्चिम महाराष्ट्राला पूराचा तडाखा बसू नये यासाठी टील प्रयत्नशील आहेत. आजची भेटही पूर नियंत्रणाच्या नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, असे पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील व कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा भेट (संग्रहित संपादित प्रतिमा)

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात मोठा पूर येतो. गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर, सांगली, सातारा अशा जिल्ह्यांमध्ये येणारा पूर नागरिक व सरकारसाठी चिंतेची बाब  ठरला आहे. 2019 साली या पुराने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत करून टाकले होते. यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी दोन्ही राज्यात योग्य समन्वय असावा याकरिता, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज कर्नाटकाचे मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची बंगलूर येथे भेट घेऊन चर्चा केली.

या बैठकीदरम्यान कृष्णा व भीमा नद्यासंदर्भात येणाऱ्या काळात पूराचे नियंत्रण कशापद्धतीने करता येईल आणि त्यात कोणत्या पद्धतीने दोन्ही राज्याने समन्वय ठेवायचा, महाराष्ट्र राज्याच्या भीमा व कृष्णा खोऱ्यातून सोडला जाणारा विसर्ग व त्याच्या माहितीचे आदान-प्रदान यासाठीची यंत्रणा, दोन्ही राज्याच्या धरण व्यवस्थापन व पूर नियंत्रणाबाबत संयुक्त आराखडा व कार्यप्रणाली यावर चर्चा झाली.

महाराष्ट्राने रिअल टाईम डाटा ॲक्वीझिशन सिस्टीम (जलहवामान विषयक विनाविलंब माहिती मिळविण्याबाबतची यंत्रणा) बसवली आहे मात्र कर्नाटक सरकारने ही यंत्रणा अजून बसवलेली नाही. कर्नाटकात ही यंत्रणा तयार झाली तर एकत्रित अलमट्टीची डायनॉमिकली लेवल कंट्रोल करणं शक्य होईल आणि एकंदर येणारा अलमट्टी धरणातील येवा आणि पुढे जाणारा येवा व महाराष्ट्रात पडणारा पाऊस या सगळ्यावर आपण प्रभावीपणे जर नियंत्रण ठेवले तर कुठून किती पाणी सोडायचं आणि कोणत्या धरणात किती पातळी ठेवायची खास करुन अलमट्टी धरणाच्या पाण्यावर चांगलं नियंत्रण ठेवता येईल अशीही चर्चा झाल्याचे श्री.पाटील यांनी स्पष्ट केले. (हेही वाचा: जयंत पाटील कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्या भेटीस; Almatti Dam पाण्यासह, सांगली कोल्हापूर महापूरावर चर्चा)

2019 चा पूर लक्षात घेता, गतवर्षी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनात अचूक नियोजन झाले होते. यंदाही पश्चिम महाराष्ट्राला पूराचा तडाखा बसू नये यासाठी टील प्रयत्नशील आहेत. आजची भेटही पूर नियंत्रणाच्या नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, असे पाटील यांनी सांगितले.