भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण: शौर्य दिनाच्या दिवशी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्यासह 163 जणांना जिल्हाबंदी
तसेच 4 तालुक्यांमध्ये जमावबंदी कलम 144 लागू करण्यात आले आहे. मागच्या वर्षी 1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. या प्रकरणी संभाजी भिडे गुरूजी व मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Bhima Koregaon Violence : 1 जानेवारी शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंदू एकता आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे, (Milind Ekbote) शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यासह 163 जणांना पुणे जिल्हाबंदी करण्यात येणार आहे. तसेच 4 तालुक्यांमध्ये जमावबंदी कलम 144 लागू करण्यात आले आहे. मागच्या वर्षी 1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. या प्रकरणी संभाजी भिडे गुरूजी व मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी संभाजी भिंडे आणि मिलींद एकबोटे यांना 1 जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्यात राहण्यास मनाई करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, असे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितलं आहे.
1 जानेवारीला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो लोक भीमा-कोरेगाव या ठिकाणी येत असतात. हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाकडून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे.(हेही वाचा - भीमा कोरेगाव प्रकरणात सुधा भारद्वाज, वरावरा राव, सुरेंद्र गडलिंग यांच्यासह 9 आरोपींना पुणे सत्र न्यायालयाचा दणका; जामीनपत्र नाकारले)
दरम्यान, भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. कोरेगाव-भीमा प्रकरणात अनेकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत अनेक साहित्यिकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत. चुकीचे गुन्हे दाखल करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्याकडून तपास काढून घ्या, अशी मागणी शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.