MG Vaidya Passes Away: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो. वैद्य यांचे आज नागपूरात निधन, वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अत्यंत हुशार, विद्वान असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.

MG Vaidya Passes Away (Photo Credits: ANI/Twitter)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धडाडीचे कार्यकर्ते (RSS) आणि माजी प्रवक्ते मा गो वेद्य (MG Vaidya) यांचे आज नागपूरात निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. आज दुपारी 3.30 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. अत्यंत हुशार, विद्वान असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण नागपूरात शोककळा पसरली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यांनी अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केले. हे काम करत असताना त्यात येणा-या अनेक अडचणींना त्यांनी अगदी धैर्याने तोंड दिले. त्यांच्या जाण्याने नागपूरकर हळहळ व्यक्त करत आहेत.

मा. गो. वैद्य यांचा जन्म 1923 मध्ये वर्धा जिल्ह्यातील तरोडा या गावी झाला. मा.गो.वैद्य संस्कृत विषयात पारंगत होते. त्यात एम.ए. करण्यासाठी त्यांना किंग एडवर्ड मेमोरियल शिष्यवृत्ती मिळाली. 1949 साली ते नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून लागले. मा.गो. वैद्यांनी सलग 17 वर्षे हिस्लॉप कॉलेजमध्ये इंग्रजी माध्यमातून संस्कृतचे अध्यापन केले. त्यांचे मराठी प्रमाणेच संस्कृत-इंग्रजीवर अद्भुत प्रभुत्व होते. त्यांनी 1966 मध्ये कॉलेजची नोकरी सोडली.हेदेखील वाचा- Mohan Rawale Passes Away: शिवसेना माजी खासदार मोहन रावले यांचे गोवा मध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने निधन

मॉरिस कॉलेजमध्ये असताना 1943 सालापासूनच मा.गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते.1948 साली गांधीहत्येनंतर संघावर बंदी आली, त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले. त्याचबरोबर मा.गो.वैद्य यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. आपली संस्कृती, ठेवणीतले संचित, मेरा भारत महान, रंग माझ्या जीवनाचे, राष्ट्र राज्य आणि शासन यांसारखी अनेक माहितीपूर्ण पुस्तके त्यांनी लिहिली.

त्या वेळी मा.गो. वैद्य हे ‘नीरद’ या टोपण नावाने ते लेखन करीत. ‘चांगले राज्य चांगल्यांचे राज्य’ हा त्यांचा लेख वाचून दैनिक हितवादचे त्या वेळचे संपादक ए.डी. मणी यांनी त्यांचे आवर्जून अभिनंदन केले होते. लेटेस्टली कडून मा.गो. वैद्य यांना भावपूर्ण श्रद्धांजली!