Meri Mati Mera Desh: उद्यापासून सुरु होणार ‘माझी माती माझा देश’अभियान; मंत्रालयात पंचप्रण शपथ व इतर कार्यक्रमांचे आयोजन

2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे.

PM Modi | Twitter

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ (Meri Mati Mera Desh) अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान बुधवार, दिनांक 09 ऑगस्ट, 2023 पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने सकाळी 10 वाजता मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे पंचप्रण शपथ तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्री आणि मान्यवरांची यावेळी उपस्थिती असणार आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा दिनांक 09 ऑगस्ट पासून सुरु होत आहे. या सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर आयोजित ‘मेरी माटी-मेरा देश’ अर्थात ‘माझी माती-माझा देश’ या अभियानाची सुरुवात होत आहे. राज्यात ग्रामपंचायत, तालुकास्तर, जिल्हास्तरावर विविध उपक्रम त्यानिमित्त आयोजित केले जात आहेत. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

लोकप्रतिनिधी, प्रशासन, लोकसहभाग अशा सर्वांचा सहभाग यामध्ये राहणार आहे. पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात दिनांक 09 ते 14ऑगस्ट या कालावधीत ग्रामस्तरावर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती असणार आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे. नागरिकांचे कर्तव्य बजावयाचे आहे. तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे’, ही पंचप्रण (शपथ) सर्व अधिकारी-  कर्मचारी मान्यवरांच्या उपस्थितीत घेणार आहेत.