Local Mega Block: रविवारी रेल्वेच्या तिनही मार्गांवर मेगा ब्लॉक; अनेक रेल्वे गाड्या रद्द, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा

त्यामुळे नागरिकांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करणे सोयाचे ठरणार आहे.

Mega Block | (File Image)

Local Mega Block: रविवारी रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे सह हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवास करणं मुंबईकरांना सोयीचं ठरणार आहे. मुंबईच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी लोकलचा प्रवास सुखकर ठरतो. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करतात. मात्र, दर रविवारी लोकलच्या दुरुस्ती कामांसाठी मेगा ब्लॉक घेतला जातो.त्यामुळे मुंबईकरांचा मोठा खोळंबा होतो.

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वेचा मुख्य मार्ग ठाणे ते दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर रविवारी सकाळी 10.50 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक (Local Train Mega Block) असेल. ब्लॉक कालावधीत सकाळी लांब पल्ल्याच्या जलद लोकल धीम्या मार्गाने वळवण्यात येतील. त्याचबरोबर काही लोकलसेवा पूर्णत: बंद राहतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक

सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉकची वेळ आहे. या कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर, हार्बर मार्गावरील अंधेरी, बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील.

पोस्ट पहा

हार्बर मार्गावर ब्लॉक

सीएसएमटी ते चुनाभट्टी /वांद्रेदरम्यान रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी – कुर्लादरम्यान विशेष लोकल धावतील.