Mask Free State: लवकरच महाराष्ट्र होणार मास्कमुक्त राज्य? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती

29 मार्चपर्यंत एकूण 16,09,44,170 लसीकरणाची नोंद झाली आहे

Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

गेल्या काही दिवसांत अनेक देशांमध्ये कोरोनाचे (Covid-19) अनेक नवीन प्रकार आढळून आले आहेत. काही ठिकाणी साथीच्या संभाव्य चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. अशात वाढत्या कोविड-19 प्रकरणांमध्ये, महाराष्ट्र सरकारची सध्या मास्कमुक्त राज्य (Mask Free State) घोषित करण्याची कोणतीही योजना नाही, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राजेश टोपे म्हणाले की, परदेशातील कोविडची परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे आवश्यक आहे. ‘'राज्य सरकारने आधीच विविध कोविड-19 प्रतिबंध शिथिल केले आहेत, परंतु मास्कमुक्त महाराष्ट्राबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही,’ असे त्यांनी नमूद केले.

टोपे म्हणाले की, सरकारने नागरिकांना योग्य ती काळजी, सावधगिरी आणि नियमांचे पालन करून आगामी सण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याची परवानगी दिली आहे. गुढीपाडव्याला नागरिकांना मिरवणुका काढण्याची परवानगी द्यावी, अशी विविध संघटना आणि भाजपची मागणी आहे, त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे मंत्र्यांनी सांगितले.

टोपे म्हणाले की, राज्य सरकार लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, जेणेकरुन पात्र लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात कोविड-19 विरूद्ध लसीकरण केले जाईल. 29 मार्चपर्यंत एकूण 16,09,44,170 लसीकरणाची नोंद झाली आहे. टोपे यांनी लसीकरण दर वाढवण्याच्या उद्देशाने मुंबई उपनगरीय गाड्यांमध्ये केवळ लसीकरण केलेल्या लोकांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले. ‘कोविड 19 वर टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर रेल्वे, बस आणि मॉलमध्ये सध्याच्या लसीकरण नियमांमध्ये शिथिलता आणण्याबाबत निर्णय घेतला जाईल,’ ते पुढे म्हणाले. (हेही वाचा: अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या शाळांना एप्रिल पर्यंत वर्ग सुरु ठेवण्याची आवश्यकता नाही; शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण)

दरम्यान, कोविड-19 व्यवस्थापनासाठी मंगळवारी झालेल्या राज्य कार्यकारी परिषदेच्या बैठकीत, राज्य सरकारची 1 एप्रिलपासून मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात मास्कची सक्ती शिथिल करण्याबाबत चर्चा झाली. परंतु अजूनतरी याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही.