कौतुकास्पद! भारतीय शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका राणे यांची लष्करात लेफ्टनंट पदी नियुक्ती
त्यानंतर शनिवारी त्यांना लष्करात लेफ्टनंट पदी नियुक्त करत त्यांच्या खांद्यावर वरिष्ठांकडून दोन स्टार्स चढविण्यात आले
काश्मीरच्या गुरेझ भागात दहशतवाद्यांशी दोनहात करताना वीरमरण आलेले शहीद मेजर कौस्तुभ राणे (Kaustubh Rane) यांच्या पत्नी कनिका राणे (Kanika Rane) प्रत्येक भारतीयाचा छाती अभिमानाने भरून येईल असे गौरवास्पद काम केले आहे. पतीच्या मृत्यूनंतर स्वत:ला सावरत आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कनिका राणे यांची लेफ्टनंट पदी (Lieutenant) नियुक्ती करण्यात आली आहे. अथक परिश्रम आणि खडतर मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे पद संपादित केले आहे. चेन्नईमध्ये त्यांनी या पदाकरिता मागील 9 महिने विशेष प्रशिक्षण घेतले होते.
वीरपत्नी कनिका राणे यांनी मागील 9 महिने चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमीत खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शनिवारी त्यांना लष्करात लेफ्टनंट पदी नियुक्त करत त्यांच्या खांद्यावर वरिष्ठांकडून दोन स्टार्स चढविण्यात आले.हेदेखील वाचा- जम्मू कश्मीर: राजौरी सेक्टर मधील गोळीबारात कोल्हापूरच्या संग्राम पाटील यांना वीरमरण
मेजर कौस्तुभ राणे यांचे 2018 साली शत्रूशी दोन हात करताना वीरमरण आले. त्यावेळी त्यांचा मुलगा फक्त दोन वर्षांचा होता. अशा वेळी आपले दु:ख गिळत आपल्या मुलाला, आपल्या सासू-सास-यांना सावरत कनिका राणे यांनी आपल्या शहीद पतीचे स्वप्न पुर्ण केले. लेफ्टनंट पदी नियुक्त होणे हे त्यांच्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. मात्र प्रबळ इच्छाशक्ती आणि पतीची शिकवण या जोरावर कनिका राणे यांनी ही गोष्ट साध्य करुन दाखवली आहे.
प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी गोष्ट कनिका राणे यांनी केली आहे. लेफ्टनंट पदी पोहोचण्यासाठी त्यांनी अनेक परीक्षा, मुलाखती दिल्या. ज्यात त्या उत्तीर्ण होत गेल्या आणि त्यांची या प्रशिक्षणासाठी निवड झाली.
दरम्यान काल जम्मू कश्मीरच्या राजौरी मध्ये नौशारा सेक्टर (Nowshera sector) झालेल्या गोळीबारात हवालदार संग्राम पाटील गंभीर जखमी झाले आणि उपचारामध्ये त्यांचे निधन झाले. दरम्यान एका आठवड्यात संग्राम पाटील हे कोल्हापुरचे दुसरे जवान आहेत ज्यांना पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोल्हापुरात पुन्हा शोककळा पसरली आहे.