गडचिरोली: आई-वडिल, भावाच्या सामूहिक आत्महत्येनंतर विवाहित मुलीची पतीसह नदीत उडी
या घटनेचा धक्का सहन न झाल्याने या विवाहित मुलीने आपल्या पतीसह नदीत उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
गडचिरोलीमध्ये (Gadchiroli) मुलीने पळून जाऊन लग्न गेल्याने आई, वडील आणि भावाने सामूहिक आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचा धक्का सहन न झाल्याने या विवाहित मुलीने आपल्या पतीसह नदीत उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या दोघांनी चामोर्शी जवळच्या पोर नदीत उडी मारत आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी गडचिरोली पोलिसांनी त्या ठिकाणी पोहचून या दोघांचे प्राण वाचवले. पोलिसांनी या दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. सध्या या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गडचिरोलीतील आनंदनगर येथे राहणाऱ्या रवींद्र वरगंटीवार, त्यांची पत्नी वैशाली आणि मुलगा साई या तिघांनी शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. रवींद्र वरगंटीवार यांच्या मुलीने शनिवारी आंतरजातीय विवाह केला होता. ही बातमी समजल्याने वरगंटीवार कुटुंबिय चिंतेत होते. त्यामुळे सोमवारी त्यांनी सामूहिक आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिघांचे मृतदेह बाहेर काढले. सोमवारी शवविच्छेदनासाठी हे तिन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. (हेही वाचा - गडचिरोली: मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने आई-वडील आणि भावाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या)
दरम्यान, आपल्या आई-वडिल आणि भावाच्या आत्महत्येची बातमी समल्यानंतर विवाहित मुलीने आपल्या पतीसह नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आपल्यामुळे कुटुंबियांनी आत्महत्या केल्याचे समजल्याने हे नवदाम्पत्य तणावात होते. वरगंटीवार यांच्या मुलीने आणि तिच्या पतीने सोशल मीडियावर आत्महत्या करणार असल्याची ऑडिओ क्लीप पोस्ट केली. त्यानंतर ते घरातून निघून गेल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना समजली. त्यानंतर त्यांनी या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
पोलिस या दोघांचा शोध घेत असतानाच हे दोघे चार्मोशी येथील पोहर नदीजवळ असल्याचे त्यांना समजले. या दोघांनीही विषारी औषध घेऊन नदीत उडी मारली. मात्र, पोलिसांनी त्यांचा जीव वाचवला. या दोघांना गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे. गडचिरोली पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.