Maratha Reservation Protest In Jalna : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांची प्रकृती ढासळली; सलाईन लावत आंदोलन सुरू
आरक्षण प्रश्नी आता तर एकतर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजययात्रा निघेल अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी काल मांडली आहे.
मराठवाड्यातील मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती आज (6 सप्टेंबर) खालावली आहे. बीपी, शूगर खालावल्याने आता त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. उपोषणावर ठाम असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. 29 ऑगस्ट पासून जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. एकीकडे सरकार सोबत चर्चा करत मराठवाड्यातील मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावत असलेल्या मनोज जरांगे यांनी जीआर निघेपर्यंत आपण उपोषण कायम ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. सध्या त्यांच्यावर आंदोलन स्थळीच उपचार सुरू आहेत.
जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. 1 सप्टेंबरच्या रात्री याच आंदोलनामध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज, गोळीबार झाल्याने परिस्थिती चिघळली होती. त्यानंतर जरांगे राज्यभर पोहचले. शरद पवारांपासून राज ठाकरे, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांनीही जालना मध्ये जाऊन जरांगे यांची भेट घेतली आहे. Maratha Reservation: शिष्ठाई निष्फळ, मनोज जरांगे उपोषणावर ठाम; मराठा आरक्षणावर अध्यादेश काढण्यासाठी चार दिवसांची मुदत .
मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?
"महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गात क्र. 83 वरील कुणबी जाती-अंतर्गत "मराठा कुणबी वा कुणबी मराठा" ही जात समाविष्ट आहे. सदरील मराठा कुणबी वा कुणबी मराठी ही जात म्हणजेच मराठा जात आहे, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. करिता मराठवाडा (औरंगाबाद), महसुली विभागातील मराठा जातीचा उल्लेख असलेल्या व्यक्तींना “कुणबी” जातीचे दाखले देण्यात यावेत," अशी प्रमुख मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तर ही मागणी मान्य देखील झाली असल्याचे बोलले जात आहे. पण फक्त दाखले नव्हे तर त्यासोबत आरक्षण देखील मिळाले पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
आरक्षण प्रश्नी आता तर एकतर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजययात्रा निघेल अशी भूमिका त्यांनी काल मांडली आहे.