Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज 'मातोश्री'वर धडकणार मशाल मोर्चा; पंढरपूर मधून निघणार आक्रोश मोर्चा

याच मुद्द्यावरुन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर मोर्चा मशाल मोर्चा धडकणार आहे.

मराठा आरक्षण (संग्रहित प्रतिमा)

मराठा आरक्षणावरील (Maratha Reservation) स्थगिती उठवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. याच मुद्द्यावरुन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान 'मातोश्री'वर मशाल मोर्चा धडकणार आहे. आज (7 नोव्हेंबर) संध्याकाळी 5 वाजल्यापासून वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चावेळी प्रतिकात्मक मशालींचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक राजन घाग यांनी दिली आहे.

मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे, नोकरीसाठी निवड होऊनही केवळ आरक्षणाच्या मुद्दामुळे रखडलेली प्रक्रीया लवकरात लवकर मार्गी लावणे, अशा विविध मागण्या आंदोलकांच्या आहेत. दरम्यान, मातोश्रीवरील मोर्च्यात सहभागी होणाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. (Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत काही पक्षांकडून राजकीय षडयंत्र केले जात आहे; अशोक चव्हाण यांचा आरोप)

त्याबरोबर पंढपूरातही मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. आज पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. नामदेव पायरीचे दर्शन घेऊन आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, या मोर्च्याला परवानगी मिळालेली नाही.  मराठा ठोक मोर्चाच्यावतीने मराठा कार्यकर्ते पंढरपूर ते मुंबई हा प्रवास पायी करणार आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर पंढपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून एसटी वाहतूकही थांबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. तसंच चोख सुरक्षा व्यवस्थेसह ड्रोनच्या मदतीने हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देत राज्य सरकारला एकच धक्का दिला होता. यावर 27 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाल्यानंतर पुढील सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत थोपवून धरलेल्या मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार आणि त्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. तसंच मराठा समाजाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मोर्चा, आंदोलनं करु नयेत, असेही आवाहन त्यांनी केले होते. तरी देखील राज्यात आयोजित करण्यात आलेल्या या दोन मोर्चांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.