Manoj Jarange: मनोज जरांगे आक्रमक; संशय व्यक्त करतानाच समाजालाही इशारा, म्हणाले 'हे थांबवा नाहीतर..!'

तो माझ्या शब्दाबाहेर अजून तरी गेला नाही. पण जाळपोळीच्याबाबतीत हे सगळं कोण करतंय अशी शंका येते आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला हिंसक वळण लागले. ज्यामुळे हे आंदोलन भरकटल्याची चर्चा सुरु झाली. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर राज्याच्या गृहमंत्रालयाला जाग आली. परिणामी हिंसाचारग्रस्त (Maratha Reservation Violence) भागात संचारबंदी आणि इंटरनेट बंद करण्याचा निर्णय लागू करण्याच आला. या पार्श्वभूमीवर आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी समाज माझे ऐकतो आहे. तो माझ्या शब्दाबाहेर अजून तरी गेला नाही. पण जाळपोळीच्याबाबतीत हे सगळं कोण करतंय अशी शंका येते आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

उगाच उद्रेक करु नका, जाळपोळ करु नका. तशी बातमी आली तर मग मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा सूचक इशारा मनोज जरांगे यांनी समाजाला दिला आहे. हे कोण करत आहे ही शंका आहेच. पण मला त्यात जायचे नाही. मी सर्वांना अवाहन करतो आहे की, कोणीही वाकडे पाऊल उचलू नका. माझ्या मते मराठा समाज मी सांगेल ते ऐकतो आहे आणि तसं कामही करतो आहे. कृपा करुन मला वेगळा निर्णय घ्यायला लावू नका, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलिसांमध्ये सोमवारी मध्यरात्री एक गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील मराठा आंदोलन आणि हिंसक घटनांचा एक आढावा घेण्यात आला. या बैठकीला सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुख उपस्थित होते. या बैठकीमध्ये पोलिस महासंचालकांनी राज्यात घडलेल्या सर्व घटनांचा आढवा ठेवल्याचे समजते. त्यानंतर शांततेत चाललेल्या आंदोलनात काही समाजकंटक जाणीवपूर्वक हिंसाचार आणि अनुचीत प्रकार करत आहेत. त्यामुळे सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या तसेच जीवितहानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्याचे समजते.

धक्कादायक म्हणजे मनोज जरांगे यांनी अवाहन करुनही सुरु झालेला थांबला नाही. कोणीही कायदा हातात घेऊ नये, हिंसाचार करु नये असे अवाहन जरांगे यांनी केले होते. असे असले तरी बीडमध्ये जमावाचा उद्रेक पाहायला मिळाला. जमाव इतका प्रक्षुब्द झाला होता की, जमावाने अजित पवार गटाचे आमदार सोळंके यांच्या घराला आग लावली. जमावाने आमदार संदीप क्षीरसागर यांच्याही बंगल्याला आग लावली. नंतर हा जमाव बस स्टँडवर दाखल झाला. तिथे उभ्या असलेल्या जवळपास 70 हून अधिक एसटी बसची जमावाने तोडफोड केली.