Maratha OBC Reservation: ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाकेंकडून प्राणांतिक उपोषणाची घोषणा; आंतरवाली सराटीतच करणार उपोषण

आता ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनीही आंतरवाली सराटीत प्राणांतिक उपोषण करण्याची घोषणा केली आहे.

Photo Credit -X

Maratha OBC Reservation: गेल्या काही काळापासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी अनेक वेळा उपोषण केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून आता ओबीसी आरक्षणात(OBC Resrvation) वाटेकरी नको असं म्हणत आता ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनीही उपोषणाचे हत्यार उगारले आहे. आंतरवाली सराटीत प्राणांतिक उपोषण करण्याची घोषणा लक्ष्मण हाके यांनी केली आहे. (हेही वाचा:Manoj jarange Patil: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास नकार, उपोषणाचा चौथा दिवस)

राज्य कुणबी नोंदी (Kunbi Maratha) असलेल्या मराठा बांधवांना सगेसोयऱ्यांच्या व्याखेत बसणारे आरक्षणही लागू व्हावे, असे मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. लक्ष्मण हाके यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर करुन आपली भूमिका मांडली आहे.

लक्ष्मण हाके यांनी काय म्हटलं?

ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी आणि ओबीसींच्या मनामध्ये एक सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी आंतरवाली सराटी येथे मी प्राणांतिक उपोषण करणार आहे. येत्या 2- 3 दिवसात उपोषणाबाबत भूमिका स्पष्ट करणार आहे. आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये व्हीजेएनटी, एसबीसी, ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या आरक्षणामध्ये इतर कोणालाही एंटर करू नये, शासनाने तशा पद्धतीची कृती करू नये आणि आमच्या ओबीसींच्या मनामध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, म्हणून आम्ही अंतरवाली सराटी येथे ओबीसी आरक्षणाच्या सन्मानार्थ प्राणांतिक असं अमरण उपोषण करणार आहे, असे त्यांनी म्हटले.