Manoj Jarange Patil On Maratha Aarakshan: मराठा आरक्षण जाहीर न झाल्यास मनोज जरांगे पाटील पुन्हा 25 ऑक्टोबरपासून उपोषणावर; यंदा आमदार, खासदारांना गावबंदी
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनीही तरूणांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केले आहे.
मराठा आरक्षण (Maratha Aarakshan) प्रश्नी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेल्या मुदतीचं आता काऊंट डाऊन सुरू झालं आहे. येत्या दोन दिवसामध्ये कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करण्याची मागणी आहे. त्यांची ही मागणी पूर्ण न झाल्यास 25 ऑक्टोबर पासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आंतरावली सराटी गावामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती देताना आता आरक्षण मिळत नाही तोपर्यंत खासदार, आमदारांना गावबंदी असेल असेही सांगण्यात आले आहे.
25 ऑक्टोबर पासून प्रत्येक जिल्ह्यात साखळी उपोषण सुरू होईल आणि त्याचं रूपांतर 28 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणामध्ये होईल असे सांगण्यात आले आहे. प्रत्येक गावात मेणबत्ती फेरी देखील काढली जाईल. तसेच राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या होत आहेत. मराठा आरक्षणाचा हा लढा शांततेने होणार आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून कुणीही आत्महत्या करू नये असे आवाहनही त्यांनी तरूण मराठा समाजाला केलं आहे.
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनीही तरूणांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केले आहे. नक्की वाचा: Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने संपवलं जीवन, नांदेडमध्ये २४ तासाच दोन आत्महत्या .
मनोज जरांगे पाटील यांनी 25 ऑक्टोबर पासून सुरू होणारे आमरण उपोषण हे पहिल्या पेक्षा कठोर असेल असं म्हटलं आहे. यावेळी पाणी किंवा अन्य उपचारांची मदत न घेता आपण उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. तर आंदोलनाची पुढील दिशा जशी भविष्यात वेळ असेल तशी जाहीर केली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे.