Manoj Jarange on Maratha Reservation: 'आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही', मराठा आरक्षण मुद्द्यावर मनोज जरांगे यांचा निश्चय
मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. 'आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही' असा इशारा देताना त्यांच्या डोळ्यात पाणी होते.

मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. 'आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही' असा इशारा देताना त्यांच्या डोळ्यात पाणी होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबई येथे निर्वाणीचे आंदोलन करण्यासाठी निघण्यापूर्वी त्यांनी जालना येथील आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भावूक झालेले जरांगे पाहून काही उपस्थितांनाही कंट फुटला. त्यानंतर काहीच वेळाने ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आंदोलकांमध्ये या वेळी प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
स्वस्थ बसण्याचा काळ संपला
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षण मुद्द्यावर मुंबईकडे जाण्याचा आणि आमरण उपोषण करण्याची घोषणा आम्ही अचानक केली नाही. ही घोषणा करुन जवळपास एक महिना उलटला. असे असताना राज्य सरकार आमच्या कोणत्याच मागण्यांकडे गांभीर्याने पाहात नाही. केवळ वेळकाढूपणा करत आहे. अशा वेळी आमच्याकडे कोणताही पर्याय नाही. आता मागचापुढचा विचार नाही. ज्यांनी आरक्षणासाठी आपले प्राण दिले त्या सर्वांचे बलीदान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या व्यथा पाहता स्वस्थ बसण्याचा काळ संपला आहे. या गोरगरीब मराठ्यांची परवड थांबवायची असेल तर शांततेच्या मार्गाने अंतिम टोक गाठल्याशिवाय गत्यंतर नाही. जर सरकार आणि समाजातील नेत्यांनीच जर गोरगरीबांच्या पोराबाळांच्या नरड्यावर पाय ठेवायचं ठरवले असेल तर संघर्ष अटळ आहे. या लोकांचं राजकीय आयुष्य कायमचं सुफडासाफ केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे जरांगे पाटील म्हणाले. या वेळीही त्यांना अश्रू अनावर झाले होते. (हेही वाचा, Maratha Reservation: 'आता आणखी वाटाघाटी नाहीत'; मराठा आरक्षण कार्यकर्ते Manoj-Jarange Patil 20 जानेवारीपासून मुंबईत उपोषणाच्या निर्णयावर ठाम)
मुंबईच्या दिशेने निघण्याची लगबग
मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मुंबईच्या दिशेने निघण्याची लगबग आगोदरपासूनच सुरु झाली आहे. मराठा आंदोलकही मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. आंतरवाली सराटी येथून हे सर्व आंदोलक, मोर्चेकरी एसटी बसच्या माध्यमातून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यासाठी काल रात्रीपासूनच आंदोलक येथे दाखल झाल्याचे पाहायला मिळत होते. या सर्व आंदोलकांची चहा, नाष्टा आणि जेवण खाण्याची सोय करण्यात आली होती. (हेही वाचा, Manoj Jarange Patil On CM Eknath Shinde: अधिकारी 'मराठा-कुणबी' नोंदीसाठी रेकॉर्डच देत नाहीत, मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार)
दरम्यान, मुंबईला आंदोलनाला निघण्यापूर्वीच जरांगे यांनी आंदोलनाची दिशा आणि मार्ग ठरवला आहे. मुंबई गाठेपर्यंतच्या मार्गावर कोणत्या ठिकाणी मुक्काम, थांबे आणि भोजन करायचे याच्या वेळाही निश्चित करण्यात आल्या आहेत. शिवाय मोर्चेकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना, नियमावली सुद्धा ठरवून देण्यात आली आहे. आंदोलनाची आगोदरची पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिसांनी आंतरवाली सराटीपासूनच बंदोबस्त तैनात केला आहे. आंदोलकांवर नजर ठेवण्यासाठी आणि कोणत्याही प्ररापची अनुचित घटना टाळण्यासाठी सीआयडी, एसआयडी, आयबीचे अधिकारी यांचा देखील सहभाग असणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)