Shivsena 53rd Anniversary: पश्चिम बंगाल राज्यात ममता बॅनर्जी शिवसेनेच्या भूमिकेत: उद्धव ठाकरे
शिवसेनाप्रमुखांनी प्रांतीय अस्मितेचा विचार मांडला तो देशाने स्वीकारला व हिंदुत्वाचे बीज टाकले तेही या भूमीत तरारले'', असे शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे.
Shivsena 53rd Anniversary: ''आज प. बंगालात (West Bengal) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) शिवसेनेचीच भूमिपुत्रांची भूमिका घेऊन उभ्या आहेत. दक्षिणेतले प्रत्येक राज्य व पक्ष प्रांतीय अस्मितेचे राजकारण करीत आहेत. राष्ट्रीय पक्षही प्रांतीय पक्षाशी युत्या व आघाडय़ा करून आपापला आकडा वाढवीत आहेत. शिवसेनाप्रमुखांनी प्रांतीय अस्मितेचा विचार मांडला तो देशाने स्वीकारला व हिंदुत्वाचे बीज टाकले तेही या भूमीत तरारले'', असे शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे.
आज (19 जून 2019) शिवसेना आपला 53 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामना मध्ये वर्धापन दिनाचे औचित्य साधत लिहिलेल्या लेखात उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका व्यक्त केली आहे. 'शिवसेना! निर्धाराने पुढे जाईल' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, ''शिवसेना म्हणजे काय? हे महाराष्ट्राने किंवा देशानेच नव्हे तरसंपूर्ण जगाने गेल्या 53 वर्षांत अनुभवले आहे. मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी 19 जून हा भाग्याचाच दिवस मानावा लागेल. याच दिवशी शिवसेना नामक एका वादळाचा जन्म झाला. वादळे आणि वावटळी अनेकदा येतात आणि जातात, पण शिवसेना नावाचे वादळ 52-53 वर्षे सतत घोंघावत आहे. शिवसेनेचा स्थापनेपासूनचा इतिहास निदान नव्या पिढीने तरी समजून घेतला पाहिजे. स्थापनेच्या वेळचे ज्वलज्जहाल वातावरण आज महाराष्ट्रात नाही. मुंबईचा लढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या विषयांशी संबंध नसलेली पिढी आज राजकारणात आहे. त्यामुळे ज्या मराठी अस्मितेसाठी शिवसेना स्थापन झाली व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जीवनाच्या 50 वर्षांची आहुती दिली तो त्याग, संघर्ष, चढ-उतार नव्या पिढीने पाहिले नाहीत. पण शिवसेनेने चार पिढ्या निश्चितच घडवल्या व शिवरायांचा भगवा मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीच्या हाती जात आहे हे महत्त्वाचे. शिवसेनेचा वटवृक्ष आज बहरला आहे. महाराष्ट्रात त्याची पाळेमुळे घट्ट रुजली, फांद्या दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचल्या. मराठी माणूस हा या जगाचा एक घटक आहे. हिंदुस्थानचा अभिमानी आहे. हिंदू संस्कार आणि संस्कृतीचा तो रक्षक आहे, असे व्यापक तत्त्वज्ञान स्वीकारून मराठी बाणा जपणारी मंडळी शिवसैनिक आहेत. शिवसेनेचे सामर्थ्य सत्ता-पदात नसून ते चळवळीत आहे. चळवळ हाच शिवसेनेचा आत्मा आहे. (हेही वाचा, भाजपशी ‘युती’ जरूर आहे; पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना: उद्धव ठाकरे)
दरम्यान, ''शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण असल्यानेच आम्ही ही 53 वर्षांची मजल मारू शकलो. शिवसेनेने भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांचा लढा दिला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा मराठी अस्मितेचा होता. मुंबई मिळाली. त्या मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा, पोटापाण्याचा आणि रोजगाराचा प्रश्न शिवसेनेने उचलला तेव्हा काय गहजब झाला! शिवसेनाप्रमुखांवर असे वार आणि घाव झाले की, आपल्याच माणसांची बाजू घेऊन उभे राहणे हा गुन्हाच ठरला; पण आज प. बंगालात ममता बॅनर्जी शिवसेनेचीच भूमिपुत्रांची भूमिका घेऊन उभ्या आहेत. दक्षिणेतले प्रत्येक राज्य व पक्ष प्रांतीय अस्मितेचे राजकारण करीत आहेत. राष्ट्रीय पक्षही प्रांतीय पक्षाशी युत्या व आघाडय़ा करून आपापला आकडा वाढवीत आहेत. शिवसेनाप्रमुखांनी प्रांतीय अस्मितेचा विचार मांडला तो देशाने स्वीकारला व हिंदुत्वाचे बीज टाकले तेही या भूमीत तरारले. हिंदुत्वाला देशभरात जाग आणण्याचे काम शिवसेनाप्रमुखांनी केले'', असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.