Maharashtra Winter Session 2021: विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक आज किंवा उद्या पार पडण्याची शक्यता, भाजपकडून आमदारांना व्हीप जारी

अध्यक्षपद निवडणूक ही राज्य सरकारच्या निर्णयावर अवलंबून असली तरी, त्याला राज्यपालांची मंजूरी आवश्यक असते. त्यामुळे राज्यपालांनी मंजूरी दिली तर ही निवडणूक आज किंवा उद्या पार पडू शकते.

Maharashtra Legislature | (File Photo)

राज्यविधिमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra Vidhimandal Session) शेवटच्या दोन दिवसात विधानसभा अध्यक्ष पद निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. अध्यक्षपद निवडणूक ही राज्य सरकारच्या निर्णयावर अवलंबून असली तरी, त्याला राज्यपालांची मंजूरी आवश्यक असते. त्यामुळे राज्यपालांनी मंजूरी दिली तर ही निवडणूक आज किंवा उद्या पार पडू शकते. अध्यक्षपद निवडणूक बिनविरोध पार पडते की, भाजप (BJP) विरोधात उमेदवार देणार याबाबत उत्सुकता आहे. याशिवाय अध्यक्षपद निवडणुकीसाठी राज्यपाल हिरवा कंदील दाखवणार की राज्य सरकारला अडचणीत येईल अशी काही भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे विधिमंडळ अधिवेशन काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसंदर्भात महाविकासआघाडी सरकारचे एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले. या शिष्टमंडळात राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश होता. या वेळी राज्यपालांना निवेदन देण्यात आले. (हेही वाचा, Maharashtra Winter Session 2021: नितेश राणे यांचे 'म्यॉव म्यॉव'; नवाब मलिक यांच्याकडून फोटोद्वारे खिल्ली)

दरम्यान, महाविकासआघाडी सरकारने घेतलेल्या विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या निर्णयावर राज्यपाल आज (सोमवार, 27 डिसेंबर) आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. अध्यक्षपद निवडीबाबत राज्यपाल सकारात्मक होते. सरकारच्या प्रस्तावावर विचार करुन ते आज आपला निर्णय कळवतील असे शिष्टमंडळातील सदस्यांनी दावा केला आहे. त्यामुळे राज्यपाल आज काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे काँग्रेस या पदासाठी कोणाचे नाव पुढे करते याबाबत उत्सुकता आहे. काँग्रेसकडून संग्राम थोपटे आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव निश्चित झाले आहे. या दोघांपैकी एकाच्या नावावर दिल्लीत एकमत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

.