Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रात थंडीची चाहूल; मराठवाडा, विदर्भात तापमानात घट

महाराष्ट्रात आता आगमन झालेली थंडी पुढील 2 महिने म्हणजे 21 फेब्रुवारी पर्यंत राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितले आहे.

Winter| PC: Pixabay.com

महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे रेंगाळल्या थंडीचं आता आगमन झालं आहे. मागील 7-8 दिवसांपासून राज्यात थंडी अनुभवायला मिळत आहेत. उत्तर भारतामधून येणार्‍या गार वार्‍यांमुळे आता थंडीचा जोर वाढणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 21 फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रात अनेक शहरांत तापमान 10 अंश सेल्सियस पर्यंत खाली जाण्याचा अंदाज आहे.सध्या मध्य महराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ मध्ये तापमानात आधीच घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी तापमान 8-9 अंश इतके कमी नोंदवण्यात आले आहे.

महाराष्ट्रात आता आगमन झालेली थंडी पुढील 2 महिने म्हणजे 21 फेब्रुवारी पर्यंत राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे आता थंडीसाठी सज्ज होण्यास नागरिकांनीही सुरूवात केली आहे. येत्या 1-2 दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका पडला आहे त्यामुळे तेथून येणार्‍या वार्‍यांमुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस गारवा कायम राहणार आहे. नक्की वाचा: Winter Health Tips: थंडीच्या दिवसात पायांना सूज येते? तर 'या' घरगुती उपयांनी मिळवा समस्येपासून सुटका .

के एस होसाळीकर ट्वीट

दरम्यान नागपूर मध्ये 7.8, अमरावती मध्ये 8 तर पुण्यात 11.2 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आलं आहे. आज दिल्ली मध्ये यंदाची सर्वात थंड सकाळ नोंदवण्यात आली आहे. 4 अंशापेक्षाही कमी तापमान असल्याने आयएमडी कडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भामध्ये आज सकाळी किमान तापमान 4-7 अंशामध्ये नोंदवण्यात आलं आहे. हे सामान्य तापमानापेक्षा कमी तापमान असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मुंबई मध्येही अल्हाददायक वातावरण आहे. मुंबई मध्ये रात्रीच्या वेळेस 20 अंशाच्या खाली तापमानाची नोंद होत आहे तर दिवसा 30-31 अंश तापमान राहतं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुका थंडीने गारठला आहे. मिनी महाबळेश्वर म्हणुन ओळख असणाऱ्या दापोलीच्या तापमानाचा पारा 12.7  अंश सेल्सिअस एवढा खाली गेला आहे. यावर्षीच्या तापमानाची सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.