Maharashtra Weather Update: 15 ते 18 मे दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या पुढील चार दिवसांचा अंदाज

अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होऊन त्याचे चक्रीवादळामध्ये रुपांतर होणार आहे. हे वादळ 18 मे च्या दरम्यान गुजरात किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे

Representational Image | (Photo Credits: PTI)

पावसाच्या (Heavy Rains) दृष्टीने महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस अतिशय महत्वाचे असणार आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होऊन त्याचे चक्रीवादळामध्ये रुपांतर होणार आहे. हे वादळ 18 मे च्या दरम्यान गुजरात किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. तोक्ते (Cyclone Tauktae) असे या वादळाचे नाव असून यामुळे पुढील चार दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनारपट्टी भागातील लोकांना सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून पुढील चार दिवसांसाठीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

15 मे- गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह (30-40 किमी प्रतितास) मुसळधार पावसाची शक्यता. गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील (घाटमाथा) काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

16 मे- गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र (घाटमाथा), मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह (30-40 किमी प्रतितास) मुसळधार पावसाची शक्यता. गोवा आणि दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर 50-60 किमी प्रतितास ते 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता.

17 मे- गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र (घाटमाथा) काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. (हेही वाचा: तोक्ते चक्रीवादळ, अतिवृष्टीदरम्यन काय काळजी घ्याल? रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी समुद्र किनाऱ्यालगतच्या नागरिकांना दिली महिती)

18 मे- गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र (घाटमाथा) आणि कर्नाटक किनारपट्टीवरील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर 40-50 प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असणण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला रविवारी आणि सोमवारी 'ऑरेंज अलर्ट' दिला आहे. चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीला वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.