Maharashtra Weather Update: राज्यात दुपारी ऊनाचा कडाका तर संध्याकाळी पावसाचा तडाखा; 10 मे पर्यंत चालणार ऊन-पावसाचा खेळ
विदर्भ, मराठवाडा खान्देशात बहुतांश ठिकाणी पारा 40 अंशांच्या पुढेच आहे. काल राज्यातले सर्वाधिक 43 पुर्णांक 4 दशांश अंश सेल्सीअस तापमान अकोल्यात नोंदवले गेले
यंदा मॉन्सून सामान्य राहील असे सांगून हवामान खात्याने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात दिवसभर सर्वत्र उन्हाचा कडाका आणि संध्याकाळी काही ठिकाणी पावसाचा तडाखा, असेच राज्यातले हवामान आहे. यामध्ये 10 तारखेपर्यंत तरी बदल होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने कळवले आहे. काल संध्याकाळी मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी तर विदर्भ आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरींनी हजेरी लावली.
राज्यातील अनेक ठिकाणी आजही असाच पाऊस अपेक्षित आहे. काल रोहित पवार यांनी माहिती दिली होती की, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी 6 ते 11 मे दरम्यान वादळी वारे आणि गारपिटीसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तर कर्जत-जामखेडमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुले शेतकऱ्यांनी पिकांची आणि जनावरांची काळजी घ्यावी.
(हेही वाचा: केरळ मध्ये यंदा मान्सून 1 जून ला दाखल होणार; हवामान खात्याचा अंदाज)
संध्याकाळी पाऊस बरसत असला तरी दुपारी उन्हाचा कडाका वाढतोच आहे. विदर्भ, मराठवाडा खान्देशात बहुतांश ठिकाणी पारा 40 अंशांच्या पुढेच आहे. काल राज्यातले सर्वाधिक 43 पुर्णांक 4 दशांश अंश सेल्सीअस तापमान अकोल्यात नोंदवले गेले.