Maharashtra Unseasonal Rain: राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा थैमान, शेती पिकांना मोठा फटका
या अवकाळी पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rains) थैमान घातलं आहे. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. राज्यातील नंदूरबार, (Nandurbar) बुलढाणा, (Buldhana) हिंगोली, (Hingoli) नांदेड (Nanded) या जिल्ह्यात अवकाळी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. बुलढाणा जिल्ह्यात मागील आठवड्यापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या शेतात असलेले कांदा, मका, भाजीपाला, फळबाग या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील बहुताशं भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात एका धार्मिक कार्यक्रमासाठी उभारलेला मंडप वादळी वाऱ्याने कोसळला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जमले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही . महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त मुखेड तालुक्यातील दापका राजा येथे शरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक जमले होते. धार्मिक गुरु आणि अन्य मान्यवर येण्यापूर्वी येथे वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्यातही अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. वाकोडी इथे असाच एक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावल्याने चक्क छत्रीखाली नवरा नवरीचे लग्न लावण्याची वेळ गावकऱ्यांवर आली होती.