Tiware Dam Incident: तिवरे धरणफुटी दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृतदेह हाती, 24 जण वाहून गेल्याची शक्यता, विरोधकांनी धरला आक्रमक सूर
रत्नागिरी: राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी , रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण (Tiware Dam) फुटल्याची घटना घडली होती. या ठिकाणी मदत कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती मदत पथकाला (NDRF) पाचारण करण्यात आले आहे. या बचाव कार्याच्या दरम्यान आतपर्यंत हाती आलेल्या मृतांची आकडेवारी वाढून तब्बल 11 प्रेतांची ओळख पटली आहे. तर अद्याप 22 ते 24 जण वाहून गेल्याचे भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेदरम्यान धरणाच्या शेजारील 12 घरे वाहून गेली आहेत. दरम्यान बचावकार्य अजूनही सुरु असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
प्राप्त माहितीनुसार आज सकाळी, सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे तिवरे धरण भरुन वाहू लागलं. त्यानंतर धरणाला भगदाड पडत असल्याचे निर्दशनास येताच गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्यानंतर तासाभरातच गावांमध्ये पाणी शिरले आणि त्यात घरांसह माणसे देखील वाहून गेली. मृतांमध्ये आत्माराम धोंडू चव्हाण (75), पांडुरंग धोंडू चव्हाण (55), दशरथ रविंद चव्हाण (20 ), चंद्रभागा कृष्णा चव्हाण (75), शारदा बळीराम चव्हाण (48), संदेश विश्वास धावडे (18) यांच्यासह 11जणांचा समावेश असून असून 13 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. एका मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही.
विरोधक आक्रमक
दरम्यान या घटनेनंतर विरोधक मंडळींनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे . या दुर्घटनेला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत सरकारी अनास्थेचे हे बळी आहेत. त्यामुळं या सरकारवरच हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यासोबतच सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने धरणाचे बांधकाम केले होते. त्यामुळं आमदार आणि कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तसंच नैतिक जबाबदारी स्वीकारून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा, असंही ते म्हणाले.