Nagpur: कोरोना संकटात अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, नागपूर येथील धक्कादायक प्रकार

या संकटकाळात वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांसह अनेकजण जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत.

Nagpur (Photo Credit: Nagpur Today)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय प्रशासनावर मोठा ताण येत आहे. तर, राज्यातील अनेक रुग्णालयात बेड अपुरे पडत असल्याचे समोर येत आहे. या संकटकाळात वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांसह अनेकजण जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, असे असतानाही नागपूर (Nagpur) येथील टोली (Toli) परिसरातील नागरिकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केल्याची घटना घडली आहे. अवैध दारू विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गेले असताना हा प्रकार घडला आहे. या घटनेवर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

नागपूर टूडेने दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या टोली परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास अजनी पोलिसांचे पथक कारवाईसाठी तेथे वाहनाने पोहोचले. परंतु, पोलिसांचे वाहन बघताच परिसरातील महिला व नागरिकांनी पोलिसांना घेराव घातला. पोलिसांच्या वाहनांवर तुफान दगडफेक केली. जीव वाचविण्यासाठी वाहन तेथेच सोडून पोलीस निघून गेले. या घटनेचे वृत्त व छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या घटनेने पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे ४०० पोलिसांचा ताफा टोलीत पोहोचला आहे. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. हे देखील वाचा- Coronavirus in Maharashtra: राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येत घट! 500 हून अधिक जणांचा मृत्यू

व्हिडिओ-

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार, राज्यातील दारूचे दुकाने बंद ठेवण्यात आले आहेत. परंतु, तरीही काहीजण अवैधरित्या दारूची विक्री करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यात नागपूर येथे आज घडलेल्या घटनेने आणखी भर घातली आहे.