Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण; 'त्या' ऑडिओ क्लिपनंतर भाजप आक्रमक

दरम्यान, पोलीस तपासात पूजाच्या आईवडिलांनी आत्महत्येबद्दल आमची कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे म्हटले होते.

Pooja Chavan Suicide Case (Photo Credit: Twitter)

पुण्यातील वानवडी भागात सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाणने (Pooja Chavan) रविवारी (7 फेब्रुवारी) आमहत्या (Suicide) करून आपले जीवन संपवले आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanawadi Police) अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, या आत्महत्याशी संबंधित दोन व्यक्तींतील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाने पेट घेतला आहे. दरम्यान, याप्रकरणात विदर्भातील मंत्र्याचा संबंध असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. तसेच याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपचे अनेक नेते करत आहेत.

पूजा चव्हाण नावाच्या 23 वर्षांच्या युवतीने रविवारी रात्री पुण्यातील वानवडी भागात इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, पोलीस तपासात पूजाच्या आईवडिलांनी आत्महत्येबद्दल आमची कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे म्हटले होते. मात्र, त्याच वेळी आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यानंतर भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे. या आत्महत्येसंदर्भात अनेक तर्क वितर्क लावले जात असून तिच्या आत्महत्येमागे महाविकास आघाडीतील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. हे देखील वाचा- Ram Kadam on Maharashtra Government: शिवजयंती उत्साहात साजरी करु न दिल्यास तीव्र आंदोलनाचा राम कदम यांचा सरकारला पत्राद्वारे इशारा

दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, याआधी महाविकास आघाडीच्या एका मंत्र्यावर बलात्काराचे आरोप झाले आहेत. त्यानंतर आता आणखी एका मंत्र्याचे नाव संबंधित तरूणीच्या आत्महत्येशी जोडले जात आहे. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात राज्यमंत्र्यांची नावे पुढे येऊ लागली आहेत. यामुळे महाराष्ट्रातील महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या प्रकरणात कोणताही दबाव न टाकता चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. एवढेच नव्हेतर, मंत्र्यांपासून राज्यातील महिला सुरक्षित नाहीत, असाही आरोप त्यांनी केला आहे.

मूळची बीड जिल्ह्यातील असलेली पूजा तिच्या मित्रासोबत वानवडी भागात फ्लॅटमध्ये राहत होती. पूजाचे भाजपच्या नेत्यांसोबत देखील फोटो असल्याचे दिसून येत आहे.