Maharashtra Road Accidents: महाराष्ट्रात 2024 मध्ये रस्ते अपघातात वाढ; मृत्यूच्या प्रमाणात किंचित घट, पहा आकडेवारी

नऊ जिल्हे आणि शहरांमध्ये मृतांच्या संख्येत 10% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. धुळे येथे 25% ने सर्वाधिक वाढ झाली आहे, त्यानंतर सिंधुदुर्ग 23.4% आहे. याउलट, मुंबईसह 24 जिल्हे आणि शहरांमध्ये मृतांच्या संख्येत घट झाली आहे.

Maharashtra Road Accidents: महाराष्ट्रात 2024 मध्ये रस्ते अपघातात वाढ; मृत्यूच्या प्रमाणात किंचित घट, पहा आकडेवारी
Accident (फोटो सौजन्य - ANI)

Maharashtra Road Accidents: महाराष्ट्र महामार्ग पोलिसांच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, राज्यातील रस्ते अपघाताबाबत माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये राज्यात रस्ते अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे, मात्र दिलासादायक बाब म्हणजे मृतांच्या संख्येत थोडीशी घट झाली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांमध्ये 19% लक्षणीय वाढ झाली आहे, तर मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्गावर 4% घट झाली आहे, असे आकडेवारीवरून दिसून येते. महाराष्ट्र हे भारतातील एक आघाडीचे औद्योगिक राज्य असून, या ठिकाणी 3.8 कोटींहून अधिक वाहने आहेत.

अहवालानुसार, 2024 मध्ये, राज्यात 36,084 रस्ते अपघात झाले, जे 2023 मध्ये नोंदलेल्या 35,243 अपघातांपेक्षा 841 ने वाढले. मात्र, मृतांमध्ये 0.20% ने किंचित घट झाली. 2023 मध्ये 15,366 मृत्यू झाले होते, जे 2024 मध्ये 15,335 पर्यंत, म्हणजेच 31 मृत्यूंची घट झाली.

नऊ जिल्हे आणि शहरांमध्ये मृतांच्या संख्येत 10% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. धुळे येथे 25% ने सर्वाधिक वाढ झाली आहे, त्यानंतर सिंधुदुर्ग 23.4% आहे. याउलट, मुंबईसह 24 जिल्हे आणि शहरांमध्ये मृतांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र, त्यापैकी फक्त चार जिल्हे आणि शहरांमध्ये 10% पेक्षा जास्त घट झाली आहे. वर्धा येथे मृतांच्या संख्येत सर्वाधिक 29.2% घट झाली आहे, तर नाशिक शहरात 15.9% घट झाली आहे. वाशिम हा एकमेव जिल्हा होता जिथे मृतांच्या संख्येत कोणताही बदल झाला नाही. (हेही वाचा: Mumbai-Pune Expressway Accidents: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातात 2024 मध्ये 19% वाढ; तब्बल 82 लोकांनी गमावला जीव)

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग: मृतांमध्ये चिंताजनक वाढ-

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर 2024 मध्ये 184 अपघात झाले, जे 2023 मध्ये 154 होते. द्रुतगती महामार्गावरील प्राणघातक अपघात 23% ने वाढले आहेत, तर मृतांमध्ये 26% वाढ झाली आहे. 2024 मध्ये 70 प्राणघातक अपघातांमध्ये 82 जणांचा मृत्यू झाला, तर 2023 मध्ये 57 प्राणघातक अपघात झाले आणि 65 जणांचा मृत्यू झाला. एक्सप्रेसवेवरील गंभीर अपघातांमध्ये 41% वाढ झाली, तर किरकोळ अपघातांमध्ये 39 % वाढ झाली.

मुंबई-नागपूर एक्सप्रेसवे: मृतांमध्ये घट, गंभीर अपघातांमध्ये वाढ-

मुंबई-नागपूर एक्सप्रेसवेवर एकूण अपघातांमध्ये किरकोळ घट झाली आहे. ते 2023 मधील 134 वरून 2024 मध्ये 128 पर्यंत गेले. सध्या नागपूर आणि इगतपुरी दरम्यान कार्यरत असलेल्या या एक्सप्रेसवेवर मृतांमध्ये 29% लक्षणीय घट झाली आहे आणि जीवघेण्या अपघातांमध्ये 2% घट झाली आहे. 2024 मध्ये, 79 प्राणघातक अपघातांमध्ये 107 जणांचा मृत्यू झाला, तर 2023 मध्ये 81 प्राणघातक अपघातांमध्ये 151 जणांचा मृत्यू झाला होता. सूत्रांनुसार, किरकोळ अपघातांमध्ये 55% घट झाली असली तरी, गंभीर अपघातांच्या संख्येत 35% वाढ झाली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2025 06:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).