माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रवासी सेवेसाठी सज्ज, मोदींच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधला जाणार?
मोदींचा वाढदिवस १७ सप्टेंबरला असल्याने त्या मुहूर्तावर उद्घाटन होणार का, याबाबत चर्चा रंगली असून दुसरीकडे वाहतूककोंडीत अडकलेल्या आयटी कर्मचाऱ्यांकडून तातडीने सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.
पुणे महानगर प्रदेशातील माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक सुरक्षा मंजुरी मिळाली आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून ही मंजुरी मिळाल्याने तांत्रिक अडथळा दूर झाला असला, तरी उद्घाटनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजन असून त्यांच्या उपलब्धतेची प्रतीक्षा सुरू आहे. 17 सप्टेंबरला मोदींचा जन्मदिवस असल्याने या विशेष तारखेची वाट पाहिली जात आहे का? अशी चर्चा देखील आता रंगायला सुरूवात झाली आहे.
सुरक्षा मंजुरी मिळाली, उद्घाटनाची तारीख कधी?
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) या मार्गिकेतील माण ते बालेवाडी या पहिल्या टप्प्यावर प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. मात्र उद्घाटन सोहळ्यासाठी पीएमआरडीएकडून मुख्यमंत्री कार्यालयाकडे पंतप्रधानांची वेळ मागवण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने पंतप्रधान कार्यालयाशी समन्वय साधून मोदींच्या उपलब्धतेबाबत विचारणा केल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधानांच्या हस्तेच उद्घाटन व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असल्याचे समजते.
१७ सप्टेंबरच्या मुहूर्ताची चर्चा
पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी असतो. मेट्रोच्या उद्घाटनासाठी त्यांच्याच वेळेची प्रतीक्षा असल्याने सप्टेंबर महिन्यातच, आणि विशेषतः वाढदिवसाच्या आसपास हा सोहळा होणार का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
आयटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा कायम
हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज ये-जा करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना वाहतूककोंडीचा नित्याचा त्रास सहन करावा लागतो. हिंजवडी, माण, वाकड आणि बालेवाडी परिसरात सकाळ-संध्याकाळ वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. मेट्रोचा पहिला टप्पा प्रत्यक्षात सुरू झाल्यास या भागातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा मोठा पर्याय उपलब्ध होणार आहे.
मात्र सेवेला मंजुरी मिळूनही केवळ औपचारिक उद्घाटनासाठी ती रोखून ठेवली जात असल्याने, प्रवाशांना आणखी किती काळ वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
सेवा आधी, सोहळा नंतर करण्याची नागरिकांची मागणी
मेट्रो प्रकल्पासाठी मोठा खर्च झाला असून प्रवासी सेवेसाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे मान्यवरांच्या वेळेची प्रतीक्षा करण्याऐवजी सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी आयटी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे. उद्घाटनाचा मुहूर्त महत्त्वाचा की वाहतूककोंडीत अडकलेल्या प्रवाशांचा वेळ, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
प्रशासनाला सज्जतेच्या सूचना
पंतप्रधानांची वेळ निश्चित होताच तातडीने उद्घाटन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अल्प मुदतीच्या नोटिशीवरही उद्घाटनाची संपूर्ण तयारी करावी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
(The above story first appeared on LatestLY on Aug 21, 2026 05:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

