Maharashtra Rains Updates: रायगड जिल्ह्यात पाच ठार, महाड शहराला पुराचा वेढा, कोल्हापूर, सांगलीसह अनेक ठिकाणी नद्यांनी ओलांडली धोक्याची पाणीपातळी, पाहा महाराष्ट्रातील पर्जन्यस्थिती
पश्चिम महाराष्ट्र (Paschim Maharashtra), कोकण (Konkan), उत्तर महाराष्ट्र, विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाडा (Marathwada) अशा सर्व विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे गावे, शहरे आणि परिसर पाण्यात गेली आहेत.
राज्यातील पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी हलका, मध्यम ते मुसळधार स्वरुपात पाऊस (Maharashtra Rains Updates) कोसळतो आहे. पश्चिम महाराष्ट्र (Paschim Maharashtra), कोकण (Konkan), उत्तर महाराष्ट्र, विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाडा (Marathwada) अशा सर्व विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे गावे, शहरे आणि परिसर पाण्यात गेली आहेत. प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून येथे आजवरच्या इतिहास प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर महापूर पाहायला मिळत आहे. या शिवाय रायगड जिल्ह्यातील महाड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. रायगडमध्ये मुसळधारपावसामळे पाच जण ठार झाल्याची माहिती आहे. तर कोल्हापूर, सांगली यांसारख्या नदीकाटच्या शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस संततधार बरसतो आहे. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.महाड शहरात पाणी साचल्याने जनजिवन विस्कळीत झाले. एनडीआरएफचे जवान शहरात पोहोचले आहेत. एनडीआरएफच्या जवानांनी हेलिकॉप्टरमधून पाहणी करत नागरिकांना अन्नाची पाकिटं दिली. तसेच, पुराच्या पाण्यात कोणी अडकले आहे का याचाही शोध सुरु आहे. रात्री अचानक मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शहरात पाणी शिरले अनेक घरांच्या दुसऱ्या मजल्यांपर्यंत पाणी पोहोचले.
एएनआय ट्विट
ट्विट
सांगली
सांगली शहरालगत असलेल्या कृष्णा नदीला पूर आला आहे. कृष्णा नदीचे पाणी धोकादायक पातळीपर्यंत पोहोचले आहे. आयर्विन पुलावरुन पाणी वाहात असून, या पुलावरुन 38 फुटांच्याही वर पाणी वाहात आहे. . कृष्णेची 40 फूट इशारा पातळी तर 45 फूट धोका पातळी आहे. पाणी अशाच प्रकारे वाढत राहिले तर लवकरच धोकादायक पातळी ओलांडली जाण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Maharashtra Rains: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी NDRF, Coast Guard, Navy आणि Army Units तैनात; शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू)
विदर्भ
कोकण, पश्चिम महाराष्ट्रासोबतच विदर्भातही पाऊस मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो आहे. प्रामुख्याने नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तास महत्त्वाचे ठरणार आहेत, असे हवामान विभागाने म्हटले आहे.अकोला, बुलढाणा, वाशिम आणि गडचिरोली आदी जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सातारा
सातारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आहे. महाबळेश्वरमध्ये रात्र एक वाजेपर्यंत 89 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे नद्यांना पूर आले असून, नागरिकांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कोयना धरणामधून आज (23 जुलै) सकाळी 8 वाजता सांडव्यावरुन 9567 क्युसेक्स विसर्ग (2 फुट) व पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक्स असा एकूण 11667 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. सकाळी 10 वाजता विसर्ग वाढवून 50000 क्युसेक्स (5 फुट) इतका करणेत येणार आहे
पुणे
पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आहे. खडकवासला धरणातून जवळपास 25036 क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे शहरात अनेक पुलांवरुन पाणी गेले आहे. पुराच्या पाण्यामुळे जलपर्णीही वाहून आल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.
कोकण
कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतो आहे. कणकवली-नरडवे मार्गावर असलेला मल्हारी पूर पावसामुळे कोसळला आहे. त्यामुळे नाटळ, दारिस्ते, दिगवळे, नरडवे गावांचा संपर्क पुर्णपणे तुटला आहे.
दरम्यान, मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या अनेक ठिकाणी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे. एनडीआरएफच्या तुकड्याही आवश्यक ठिकाणी पोहोचल्या असून मदत आणि बचावकार्य सुरु आहे.