Maharashtra Rains: उद्या रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सातारा, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट; जिल्हा पातळीवरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क, CM Eknath Shinde यांनी घेतला आढावा

गडचिरोली, रायगड व रत्नागिरी जिल्हे वगळता उर्वरीत जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवलेली नाही. पूर परिस्थितीबाबत बचाव कार्यासाठी म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ च्या पथकांना आपत्कालिन परिस्थितीकरिता पूर्व तैनात करण्यात आले आहे.

Heavy Rains | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज, बुधवारी मुसळधार पावसाने (Heavy Rains) हजेरी लावली. यामुळे अनेक भागात पाणी साचले, तर काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवली. राज्यात येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच राज्यस्तरावर 24x7 नियंत्रण कक्ष सुरु आहे. नदीच्या पुरामुळे नदीने बाधित गावांना सर्तकतेचा इशारा स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आलेला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला आज भेट देऊन राज्यातील पूरप्रवण क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या संबंधित सूचना दिल्या. यावेळी पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि गडचिरोली येथील परिस्थितीची माहिती जाणून घेतली. तसेच जिल्हा पातळीवरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देश दिले.

मंत्री पाटील म्हणाले, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सचेत प्रणालीद्वारे राज्यस्तरावरून पूर्व इशारा म्हणून सूचित करण्यात आले आहे. गडचिरोली 15 लाख, रायगड 40 लाख तसेच वर्धा, चंद्रपूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील पूरप्रवण क्षेत्रांतील नागरिकांना इशारा दिलेला आहे. बचाव पथक व जिल्हाधिकारी कार्यालय हे सातत्याने समन्वय ठेवून हवामानाचा अंदाज व सद्य:स्थिती व स्थानिक स्थितीचे आकलन करुन बचाव पथके तैनात केलेली आहेत. भामरगडमधील गडचिरोलीतील 1684 गावांपैकी 100 गावे पुलावर पाणी आल्याने संपर्कात नाही.

सद्य:स्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे व रायगड रसायनी या भागात पूर परिस्थिती आहे. गडचिरोली, रायगड व रत्नागिरी जिल्हे वगळता उर्वरीत जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवलेली नाही. पूर परिस्थितीबाबत बचाव कार्यासाठी म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ च्या पथकांना आपत्कालिन परिस्थितीकरिता पूर्व तैनात करण्यात आले आहे. एनडीआरएफचे पथक पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई तर, एसडीआरएफची पथके गडचिरोली, नांदेड येथे तैनात केली आहेत. (हेही वाचा: शेतकऱ्यांना दिलासा! दुबार पेरणीची वेळ आल्यास मिळणार मोफत बियाणे; कृषी मंत्री Dhananjay Munde यांची घोषणा)

मंत्री पाटील म्हणाले की, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार 20 जुलै 2023 रोजी रेड अलर्ट असलेले जिल्हे निरंक असून, ऑरेंज अर्लट असलेले जिल्हे रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सातारा, पुणे, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया असे आहेत. तसेच 21 जुलै 2023 रोजी रेड अलर्ट निरंक असून ऑरेंज अलर्ट– रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे या जिल्ह्यात असून, 22 जुलै 2023 रोजी रेड अलर्ट– निरंक असून, रायगड, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे.

रायगड व गडचिरोली, पालघर आणि चंद्रपूर जिल्ह्याने पूर परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शाळांना उद्या, गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांत उद्याची स्थानिक स्थिती पाहून जिल्हाधिकारी निर्णय घेतील.