Maharashtra Rain Update on 28 May: महाराष्ट्रात आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता; तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या आजचे हवामान
या लवकर आलेल्या मान्सूनमुळे महाराष्ट्रात अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. मुंबईत 26 मे रोजी 135.4 मिमी पावसाने सहा ठिकाणी पाणी साचले, 18 शॉर्ट सर्किट आणि पाच भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. मेट्रो 3 च्या आचार्य अत्रे स्टेशनवर पाणी साचल्याने सेवा बंद करावी लागली.
यंदा महाराष्ट्रात मान्सून लवकर दाखल झाल्याने गेल्या काही दिवसांपासून राज्यात जवळजवळ सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rains) पडत आहे. आज या पावसाची तीव्रता काही प्रमाणत कमी झाली असली तरी, अनेक ठिकाणी अजूनही हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या अंदाजानुसार, आज मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरीसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे.
मध्यम पाऊस- पालघर, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव.
परिसरात मुसळधार पावसाची शक्यता- ठाणे, मुंबई.
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मुसळधार पावसाची शक्यता- भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर.
विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस- धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, वर्धा, वाशीम, यवतमाळ.
दरम्यान, या लवकर आलेल्या मान्सूनमुळे महाराष्ट्रात अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. मुंबईत 26 मे रोजी 135.4 मिमी पावसाने सहा ठिकाणी पाणी साचले, 18 शॉर्ट सर्किट आणि पाच भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. मेट्रो 3 च्या आचार्य अत्रे स्टेशनवर पाणी साचल्याने सेवा बंद करावी लागली. कुलाबा वेधशाळेने 295 मिमी पावसाची नोंद केली, जी 1918 नंतर मे महिन्यातील सर्वाधिक आहे. राज्यातील नद्या आणि धरणांचे पाणी पातळी वाढली आहे, ज्यामुळे पूराचा धोका निर्माण झाला आहे. (हेही वाचा: Monsoon Forecast 2025: जून महिन्यात 108% पाऊस, खरीप पिके आणि कृषी क्षेत्रास दिलासा; हवामान अंदाज वर्तवताना IMD चे भाकीत)
राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरवातीलाच राज्यातील अतिवृष्टी, धरणातील पाणी साठे, पिक-परिस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला.