Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी फडणवीस आशावादी, सरकारला धोका नसल्याचा व्यक्त केला विश्वास
काहीही होणार नाही. आम्ही सगळं कायदेशीर केले आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल, ही अपेक्षा असल्याचा ठाम विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा निकाल सर्वोच्च न्यायालयात येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जवळ येत असल्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटाची धाकधुक वाढली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांचे सरकार कोसळेल असा दावा महाविकास आघाडीचे अनेक नेते करत आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयाकडून येणाऱ्या निर्णयाबाबत आम्ही आशादायी आहोत. आमच्या सरकारला काहीही होणार नाही, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची शांतपणे वाट पाहिली पाहिजे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत आशादायी आहोत. काहीही होणार नाही. आम्ही सगळं कायदेशीर केले आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल, ही अपेक्षा असल्याचा ठाम विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 16 मार्च रोजी शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील वादावर सुनावणी पूर्ण झाली होती. तेव्हापासून निकालाची प्रतीक्षा सगळ्यांना लागली आहे.
सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्याआधीच अनेक राजकीय पंडितांनी आणि प्रसारमाध्यमांनी परस्पर निर्णय जाहीर करुन टाकला आहे. एवढेच नव्हे त्यावर भविष्यातील राजकीय समीकरणं आणि नव्या सरकारबाबत भाकीते केली आहेत. हा प्रकार योग्य नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची शांतपणे वाट पाहिली पाहिजे. असे त्यांनी म्हटले आहे.