Maharashtra Politics: काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात घेणार शरद पवार यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही भेट होण्याची शक्यता आहे. भेटीचे नेमके कारण स्पष्ट नाही. मात्र, राज्यातील राजकीय घडामोडींवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही भेट होण्याची शक्यता आहे. भेटीचे नेमके कारण स्पष्ट नाही. मात्र, राज्यातील राजकीय घडामोडींवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. राज्याच्या राजकारणात पाठिमागील काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. तसेच राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांच्या आघाडीची म्हणजेच INDIAची एक बैठकही आगामी काळात मुंबई येथे पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पवारांसोबतच्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडलेल्या बंडामुळेही महाविकासआघाडीचे पुढे काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. अर्थात शरद पवार अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांच्या कृतीवरुन दिसून आले आहे. पाटणा येथील बैठकीप्रमाणेच ते बंगळुरु येथे पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी अजित पवार गटाला उघडपणे अद्याप तरी कोणत्याही प्रकारचे सहकार्य होईल, असे विधान केले नाही. त्यामुळे ते विरोधकांच्या आघाडीसोबतच असल्याचा संदेश जातो आहे. असे असले तरी मधल्या काळात अजित पवार गटातील आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. एकदा नव्हे तर दोन वेळा ही भेट घडली. या भेटीनंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. आजच्या बैठकीत या भेटीबाबतही काही चर्चा होते का याबात उत्सुकता आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केले. या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही शिवसेना पक्षाच्या मार्गानेच पुढे चालली आहे की काय असा सवाल उपस्थित केला जातो आहे. अजित पवार गटाकडून मोठ्या प्रमाणावर प्रतित्रापत्रे भरुन घेतली जात आहे. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गाटाला नोटीस पाठविण्यात आल्याचे समजते. अजित पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवरुन हे नोटीस पाठविल्याचे समजते. त्यामुळे पटोले, थोरात आणि पवारांच्या बैठकीत या मुद्द्यांवर काय चर्चा होते. याबातब उत्सुकता आहे.