Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष; कोर्ट दुसऱ्या दिवशीही निर्णयाप्रत नाही, आज काय घडलं कोर्टात?
सलग सुनावणीचा आजचा दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशीची सुनावणी आज संपली असली तरी दुसऱ्या दिवशीही कोर्ट (घटनापीठ) कोणत्याही निर्णयाप्रत आले नाही.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) घटनापीठासमोर (Constitution Bench) सुरु आहे. सलग सुनावणीचा आजचा दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशीची सुनावणी आज संपली असली तरी दुसऱ्या दिवशीही कोर्ट (घटनापीठ) कोणत्याही निर्णयाप्रत आले नाही. आज प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवी आणि अॅड. निरज किशन कौल यांनी बाजू मांडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) या पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपील सिब्बल (Kapil Sibal), अभिषेक मनु सिंघवी आणि देवकत्त कामत हे बाजू मांडत आहेत. आजही दिवसभर प्रदीर्घ काळ युक्तीवाद सुरु राहिले.
वकील हरीश साळवे यांनी ऑनलाईन पद्धतीने घटनापीठासमोरील सुनावणीत हजेरी लावली. हरीश साळवे यांच्या युक्तीवादाच प्रामुख्याने भर हा नबाब रेबिया प्रकरणाच्या हवाल्याने कोर्टाने घटनांचा विचार करावा असा राहिला. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीमुळे पुढील घटना घडल्या. जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामाच दिला नसता तर अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या असत्या असा युक्तीवाद एकनाथ शिंदे आणि गटाने उचललेल्या पावलाच्या समर्थनार्थ केला. हरीश साळवी यांनी साधारण 45 मिनीटे आपला युक्तीवाद केला. त्यानंतर पुढचा युक्तिवाद हा निरज किशन कौल यांनी केला. (हेही वाचा, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली, काय घडलं कोर्टात?)
दरम्यान, घटनापीठाने सुनावणी घेत महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील बाजू पूर्णपणे दिवसभर ऐकून घेतली. आजही युक्तीवाद पूर्ण होऊ शकला नाही. वकील निरज किशन कौल यांचा युक्तिवाद आज अपूर्णच झाला. त्यामुळे आता उद्याही निरज किशन कौल आणि राज्यपालाच्या वतीने सॉलिसीटर जनरल मुकूल रोहतगी युक्तीवाद करणार आहेत. उद्या संपूर्ण बाजू ऐकल्यानंतर या प्रकरणाच सुनावणी पाच न्यायाधीशांच्याच खंडपीठासमोर होणार की हे प्रकरण सात न्यायाधीषांच्या आणखी विस्तृत खंडपीठासमोर जाणार याबाबत कोर्ट निर्णय देणार आहे. उद्याच्या सुनावणीनंतर कोर्ट निर्णयाप्रत पोहचण्याची शक्यता आहे.