महाराष्ट्रात गेल्या 24 तासात पोलीस दलातील आणखी 288 जणांना कोरोनाची लागण तर 2 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात महाराष्ट्रात पोलीस दलातील आणखी 288 जणांना कोरोनाची लागण झाली असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून सुद्धा कोरोनाबाधित रुग्णांवर अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. याच दरम्यान राज्यातील पोलीस कर्मचारी सुद्धा आपले कर्तव्य चोखपणे बजावताना दिसून येत आहेत. परंतु त्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात पोलीस दलातील आणखी 288 जणांना कोरोनाची लागण झाली असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात पोलीस दलातील एकूण 13,468 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यापैकी 2478 अॅक्टिव्ह रुग्ण असून 10,852 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच आता पर्यंत 138 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संकटकाळात 55 वर्षाहून अधिक वय असलेले पोलीस दलातील कर्मचारी काम करणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला आहे.(Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या खासगी डॉक्टरांना महाराष्ट्र शासनाकडून 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण)
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये काल 14,161 कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात नवीन 11,749 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 4,70,873 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 1,64,562 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 71.62% झाले आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 34, 92,966 नमुन्यांपैकी 6,57,450 म्हणजेच 18.82 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.