Maharashtra Phone Tapping Case: आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स; फोन टॅपींग प्रकरणी होणार चौकशी
हे समन्स हैदराबादच्या डीजीपींच्या हस्तक्षेपाने पाठविण्यात आले असून, ते रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी धाडण्यात आले आहे
महाराष्ट्रात गाजत असलेल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या फोन कॉल्स टॅपिंग प्रकरणात (Maharashtra Phone Tapping Case) महाराष्ट्र सायबर सेल विभागाने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला ((IPS Officer Rashmi Shukla) यांना समन्स पाठवले आहे. केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या महाराष्ट्र केडरच्य आयपीएस अधिकारी आहेत. रश्मी शुक्ला या एसआयडी विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत होत्या. या वेळी त्यांनी पदाचा गैरवापर करत बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. रश्मी शुक्ला यांना पाठविण्यात आलेले समन्स हे महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई सायबर सेल विभागाने (Mumbai Police Cyber Division) पाठवले आहे. हे समन्स हैदराबादच्या डीजीपींच्या हस्तक्षेपाने पाठविण्यात आले असून, ते रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी धाडण्यात आले आहे.
दरम्यान, पाठविण्यात आलेल्या समन्समध्ये रश्मी शुक्ला यांना येत्या 28 एप्रिल रोजी प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये जबाबासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणाच्या तपासासंदर्भात मुंबई सायबर विभागाचे एक पथकही दिल्लीला गेल्याचे वृत्त आहे. मात्र, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. रश्मी शुक्ला या सध्या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर कार्यरत आहेत. फेब्रुवारी 2020 पासून त्या केंद्रामध्ये प्रतिनियुक्तीवर गेल्या आहेत. (हेही वाचा, Haribhau Rathod On Rashmi Shukla: रश्मी शुक्ला यांच्यावर माजी खासदार हरीभाऊ राठोड यांचा सणसणाटी आरोप म्हणाले 'त्या खंडणी गोळा करायच्या')
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या कथीत फोन टॅप प्रकरणावरुन महाराष्ट्र आणि दिल्लीच्याही राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटले. या प्रकरणाची राज्य सरकारनेही गंभीर दखल घेतली. तर विरोधी पक्षानेही दिल्लीवाऱ्या करत हे प्रकरण तापविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर थेट दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी बंद लिफाप्यात काही कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह दिल्याचे फडणवीस यांनी स्वत:च सांगितले.
दरम्यान, महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते की, 'राज्य सरकारला मूर्ख बनवत रश्मी शुक्ला यांनी 'अ' व्यक्तीच्या फोन टॅपिंगची परवानगी घेऊन 'B' व्यक्तीचा फोन टॅप केला हे अत्यंत भयंकर आहे आणि या रिपोर्टच्या माध्यमातून महाविकासआघाडीची बदनामी करण्याचं हे एक नियोजनबद्ध केलेलं कारस्थान होतं.'