IPL Auction 2025 Live

Maharashtra Onion Crisis: महाराष्ट्रातील कांदा प्रश्न लवकरच निकाली लागणार; अजित पवारांचा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना फोन, व्यापाऱ्यांना दिले 'हे' आश्वासन

उपमुख्यमंत्री पवार यांनी कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात तातडीने लक्ष घालून हा विषय सोडविण्यासाठी दाखवलेल्या तत्परतेबद्दल कांदा व्यापाऱ्यांच्या संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.

Onion | Representational image (Photo Credits: pxhere)

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांवर केंद्र सरकारच्या सहकार्यातून मार्ग काढला जाईल, असा विश्वास देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदाप्रश्नी मंत्रालयात आयोजित बैठकीतूनच केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना दूरध्वनी केला. मंत्री गोयल यांनीही उपमुख्यमंत्र्यांच्या दूरध्वनीला प्रतिसाद देत आज संध्याकाळी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत, कांदा व्यापाऱ्यांच्या प्रश्नी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे तसेच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात तातडीने लक्ष घालून हा विषय सोडविण्यासाठी दाखवलेल्या तत्परतेबद्दल कांदा व्यापाऱ्यांच्या संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांध्ये बंद ठेवलेली कांदा खरेदी तात्काळ सुरू करावी, असे आवाहन केले आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न करणार असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, देशांतर्गत कांद्याचे दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावले आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून केंद्र सरकारने 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल दराने नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला होता. मात्र, दोन्ही यंत्रणांमार्फत अत्यंत कमी प्रमाणात खरेदी करण्यात आली असून खरेदीची मुदतही 10 सप्टेंबरला संपली आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी व्यवहार सुरू करावेत, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. (हेही वाचा: SDC Merger to Cosmos Bank: साहेबराव देशमुख को-ऑप बँकेचे कॉसमॉस बँकेत विलीनीकरण, RBI ची मान्यता)

कांदा व्यापाऱ्यांचा तोटा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर व्यापारी संघटनेने कांदा खरेदी बंद केल्याच्या निवेदनावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकरी, कांदा खरेदी व्यापारी आणि ग्राहक या सर्वांच्या हिताचाच शासन विचार करेल. देशातील इतर राज्यांच्या बाजारांमध्ये नाफेडमार्फत कमी दरात कांदा विक्री होत असल्यामुळे राज्यातील कांदा व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्याशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.