Maharashtra New Home Minster: शरद पवार यांनी गृहमंत्री पदासाठी राष्ट्रवादीतून दिलीप वळसे पाटील यांचीच निवड का केली? जाणून घ्या कारण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून गृहमंत्री (Maharashtra New Home Minister) पदासाठी दिलपी वळसे पाटील यांचीच निवड का करण्यात आली? हा सवाल मोठा उत्सुकतेचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात या पदासाठी एकापेक्षा एक मोहरे असताना पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलीप वळसे पाटील यांचीच निवड केली. याला तशी काही खास कारणेही आहेत. या कारणांचा केलेला हा अल्पसा उहापोह.
भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन गृहमंत्री (Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची विकेट पडली. त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता या पदावर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातून दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची निवड झाली. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे महाविकासआघाडी सरकारमध्ये उत्पादन शुल्क मंत्रालयाचा कार्यरभार होता. त्यांच्याकडे असलेला हा कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कामगार विभागाच अतिरीक्त कार्यभार हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवीण्यात आला. आता इतकी सगळी खांदेपालट करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून गृहमंत्री (Maharashtra New Home Minister) पदासाठी दिलपी वळसे पाटील यांचीच निवड का करण्यात आली? हा सवाल मोठा उत्सुकतेचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात या पदासाठी एकापेक्षा एक मोहरे असताना पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलीप वळसे पाटील यांचीच निवड केली. याला तशी काही खास कारणेही आहेत. या कारणांचा केलेला हा अल्पसा उहापोह.
शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक ते गृहमंत्री आणि बरंच काही
दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक ज्येष्ठ नेते आहेत. पक्षात शरद पवार यांच्यानंतरच्या पहिल्या फळीतील जे काही मोजके नेते आहेत त्यांच्यात दिलीप वळसे पाटील यांचा समावेश होतो. ते शरद पवार यांच्या केवळ निकटवर्तीयातीलच नव्हे तर अत्यंत विश्वासूंपैकी एक आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी प्रदीर्घ काळ शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या कामाची पद्धत आणि दिलीप वळसे पाटील यांची काम करण्याची क्षमता अशा दोन्ही गोष्टी एकमेकांना ज्ञात आहेत.
संसदीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव
दिलीप वळसे पाटील यांना संसदीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग ते सलग सातव्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे संसदीय राजकारणातील बारीकसारीक गोष्टींसह अनेक खाचाखोचा वळसे पाटील यांना माहिती आहेत. दुसरे असे की, विधिमंडळात त्यांनी 2009 ते 2014 या काळात विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबादी सांभाळली होती. राज्यात युतीचे सरकार होते तेव्हा दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात केलेली कामगिरी कौतुकास्पद होती. त्यामुळे त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारही देऊनही गौरविण्यात आले होते. (हेही वाचा, Maharashtra New Home Minster: अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री)
विविध मंत्रालयांचा अनुभव
आपल्या एकूण राजकीय जीवनात दिलीप वळसे पाटील यांनी विविध मंत्रालयांचा कारभार सांभाळला आहे. या आधी आघाडी सरकारमध्ये त्यांनी महत्त्वाची मंत्रीपदे सांभाळली आहेत. यात वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा, उत्पादन शुल्क, कामगार विभागासारख्या मंत्रालयांचा समावेश होतो.
विरोधी पक्षांमध्येही मित्रत्वाचे संबंध
दिलीप वळसे पाटील यांचे विरोधी पक्षातही मित्रत्वाचे संबंध आहेत. ते शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान नेते आहेत. परंतू, विरोधी पक्षांमधील काही नेत्यांची राजकीय कारकीर्द घडविण्यातही त्यांचा सहभाग असतो. युतीस सरकारमधील राज्याचे तत्कालीन अन्न पुरवठा मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश बापट यांनी याबाबत एकदा जाहीरपणे भाषणात सांगितले होते. दिलीप वळसे पाटील यांच्या एकसष्ठीच्या कार्यक्रमात बोलताना गिरीश बापट यांनी म्हटले होते की, दिलीप वळसे पाटील हे माझे राजकीय गुरु आणि मार्गदर्शक आहेत. हे सांगण्यास मला भीतीही वाटत नाही आणि संकोचही वाटत नाही, असेही बापट म्हणाले होते. यावरुन त्यांचे विरोधी पक्षातही मैत्रिपूर्ण संबंध असल्याचे पुढे येते.
कायदेशीर प्रक्रियांची जाण
दिलीप वळसे पाटील हे बी. ए. (ऑनर्स), डी. जे., एल.एल.एम. आहेत. त्यामुळे त्यांना विधिमंडळ कामकाज आणि कायदेशीर प्रक्रिया आदी गोष्टींची खडानखडा माहिती आहे. संसदीय राजकारणाच्या आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्याची चुणूक वळसे पाटील यांनी अनेकदा दाखवून दिली आहे.
दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांच्या कामाची पद्धत त्यांचे पक्षासाठी असलेले योगदान पहात अडचणीच्या काळात ते सरकार आणि पक्षासाठी महत्त्वपूर्ण ठरु शकतात. शिवाय शरद पवार यांच्या धोरणांना धक्का लागेल असा धोरणात्मक आणि महत्वपूर्ण निर्णय ते स्वतंत्रपणे घेणार नाहीत याचीही जाण पक्षनेतृत्वाला नक्कीच आहे. त्यांमुळे अडचणीत आलेले सरकार, मलीन झालेली पक्षाची प्रतिमा यांतून बाहेर पडण्यासाठी दिलीप वळसे पाटील हे नाव महत्त्वपूर्ण ठरु शकते, असा शरद पवार यांचा प्रयत्न असू शकतो. त्यातूनच दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची गृहमंत्री म्हणून निवड झाल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)