MNS चे आमदार प्रमोद पाटील कोणाला देणार पाठिंबा? पाहा त्यांनी केलेला हा खुलासा
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव निवडून आलेले आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील हे कोणाला पाठिंबा देणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल.
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आता काही दिवस उलटले असले तरी सरकार स्थापनेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. भाजप पक्षाने 105 जागी विजय मिळवला आहे तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी दोन्ही पक्षांना एकत्र येणं बंधनकारक असलं तर दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावरून मात्र अडून बसले आहेत.
तसेच भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून जमतील तितके अपेक्षा उमेदवार आपल्याकडे घेण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव निवडून आलेले आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील हे कोणाला पाठिंबा देणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या भूमिकेविषयी खुलासा केला. ते म्हणाले, "आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेनुसार निर्णय घेणार."
विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणातून सतत म्हटलं आहे की, "राज्यात प्रबळ विरोधी पक्ष हवा आणि त्यासाठी मनसेच्या उमेदवारांना मत द्या".
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शंभरहून अधिक जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यातील फक्त प्रमोद पाटील या एकमेव उमेदवाराला विजय मिळवता आला. त्यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवली व त्यांच्या विरुद्ध असलेले शिवसेनेचे रमेश म्हात्रे हे पराभूत झाले.