Maharashtra Monsoon Update: मुंबईसह ठाणे, कोकणात येत्या 21 आणि 22 सप्टेंबरला मुसळधार पावसाची शक्यता- IMD
तर भाईंदर आणि मीरारोड परिसरात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे.
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, मुंबईत येत्या 24 तासांत अधूनमधून पावसाच्या सरी बरसतील (Rainfall) अशी माहिती मिळत आहे. तसेच येत्या 21 व 22 सप्टेंबरला म्हणजेच सोमवार आणि मंगळवारी मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि कोकणात (Konkan) मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान IMD दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाण्यात मागील 24 तासांत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. तर भाईंदर आणि मीरारोड परिसरात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे.
शनिवारी दक्षिण मुंबईपेक्षा उपनगरामध्ये अधिक पाऊस पडला, तर उत्तर उपनगरातील काही भागात मुसळधार पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे 12.4 मिमी तर कुलाबा येथे सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान 2 मिमी पावसाची नोंद झाली. याच काळात भाईंदर येथे 89 मिमी, मीरा रोड येथे 46 मिमी इतका पाऊस नोंदविण्यात आला. मालाडमध्ये 29.4 मिमी तर वांद्रे येथे 13.4 मिमी नोंद झाली. रविवारी हलका ते मध्यम पाऊस किंवा गडगडाटी पावसाची शक्यता असणाऱ्या ढगांचा अंदाज वर्तविला गेला आहे.
मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या भागात येत्या 24 तासांत अधूनमधून पावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर उद्या, परवामध्ये कोकण, गोवा भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.