Mumbai Monsoon 2019: पावसाचा जोर, साथीचे आजार; तापाने फणफणले मुंबईकर
बाहेरचे खाने टाळा. बाहेर जाताना शक्यतो घरचे अन्न सोबत घेऊन जा. कोणताही आजार जसे की, ताप, डोकेदुखी, सर्दी, खोकला, घसादुखी आणि अंगदुखी अंगावर काढू नका.
Maharashtra Monsoon 2019: उकाड्याने कासावीस झालेल्या मुंबईकरांना पावसाने यंदा काहीसा उशारीच दिलासा दिला. त्यामुळे उशीरा आलेल्या पावसाचे मुंबईकरांना सुरुवातीला भारी कौतुक वाटले. पण, आता या कौतुकाचे रुपांतर वैतागात झाले आहे. कारण उशीरा आलेला पाहूस काहिसा रेंगाळला आणि आता तर त्याने थेट मुक्कामच ठोकला आहे. संततधार कोसळणारा पाऊस कमी होता की काय म्हणून आता मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये साथीच्या आजारांनी डोकं वर काढले आहे. मुंबईकर तापाने फणफणले आहेत. डोकेदुखी, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी आणि संसर्गजन्य ताप या समान लक्षणांच्या रुग्णांनी सार्वजनिक आणि खासगी रुग्णालये भरुन गेले आहेत. सांगितले जाते की गेल्या पंधरवड्यापासून अशा रुग्णांची रुग्णालयात येण्याची संख्या जवळपास बारा ते पंधरा टक्क्यांनी वाढली आहे.
कोणताच आजार अथवा दुखणे अंगावर काढू नका, असे आरोग्य विभागाकडून नेहमीच सांगितले जाते. मात्र, डोकेदुखी, सर्दी, खोकला, घसादुखी आणि अंगदुखी, किरकोळ ताप अशा कारणांसाठी अनेक नागरिक रुग्णालयात जात नाहीत. डॉक्टरांचा सल्ला घेते नाहीत. असे दुखणे शक्यतो ते अंगावरच काढण्याचा प्रयत्न करतात. काही नागरिक तर जवळच्या मेडिकल स्टअरमध्ये जाऊन औषध विक्रेत्याला होणारा त्रास सांगतात व त्याच्याकडूनच त्याच्या सल्ल्याने औषधे घेतात. असे केल्याने आजार बळावतो. अगदीच सहन झाले नाही तर, अशी मंडळी डॉक्टरांचा सल्ला घेतात. असे केल्यानेच संसर्गजन्य आजारांचा मुक्काम अधिक काळ वाढतो, असे डॉक्टर सांगतात.
दरम्यान, मुंबईत पावसाची संततधार दीर्घकाळ कोसळत राहते हा पूर्वानुभव ध्यानात घेऊन मुंबई महापालिका आणि खासगी रुग्णालयंही औषधांचा पुरेसा साठा आगोदरच तयार ठेवण्यावर भर देतात. त्यामुळे ऐन पावसाळ्यात जरी रुग्णांची संख्या वाढली तरी, त्यांना सेवा देणे शक्य होते. मात्र, कधी कधी रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालया बेडची संख्या कमी पडण्याचे प्रकार घडतात. (हेही वाचा, Maharashtra Monsoon 2019 Live Updates: मुसळधार पावसामुळे पालघर मधील शाळा-कॉलेजांना आज सुट्टी)
दरम्यान, नागरिकांनी पावसाळ्यात सुरुवातीपासूनच आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यासाठी उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, पाणी उकळून, गाळून आणि थंड करुनच प्या. बाहेरचे खाने टाळा. बाहेर जाताना शक्यतो घरचे अन्न सोबत घेऊन जा. कोणताही आजार जसे की, ताप, डोकेदुखी, सर्दी, खोकला, घसादुखी आणि अंगदुखी अंगावर काढू नका. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य असा आहार घ्या. पावसात भिजल्यावर लगेच वातानुकुलीत वातावरणात (एसी) जाऊ नका. कपडे केस ओले ठेऊ नका. डॉक्टरांनी दिलेला प्रतिजैविकांचा कोर्स अर्धवट सोडू नका.