Maharashtra Monsoon Live Updates: मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यात जीवितहानी तसेच वित्तहानी
रविवारी दडी मारलेला पाऊस आज (8 जुलै) पुन्हा दमदार बरसायला सुरूवात झाली आहे. मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरूवात आहे. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक मंदावली आहे.
सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. यामुळे गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात 27 घरांची पडझड झाली असून, पुढील चार तासांत पावसाची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
खारघर येथील पांडवकडा धबधब्याचा ओढा फुटल्यानं सायन-पनवेल मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. सायन सारख्या सखल भागामध्ये पाणी साचून राहिल्याने अनेक वाहनं अडकून पडल्याने या भागात मोठ्या ट्राफिक जाम आहे.
यंदा विकेंडला मंदावलेला पाऊस मुंबईत आज सकाळपासून पुन्हा बरसण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे रायगड, पालघर सह मुंबई आणि ठाण्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार बरसू शकतो असा अंदाज मुंबई हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबईमध्ये सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे हार्बर लाईनवरील वाहतूक 10 मिनिटं, मध्य रेल्वे वरील वाहतूक 10-15 मिनिटं तर पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक 5 मिनिटं उशिराने धावत आहे.
मध्य रेल्वे च्या सायन, विक्रोळी, कुर्ला स्थानकातील रेल्वे रूळांवर पाणी आलं आहे. मात्र रेल्वे कर्मचारी पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून साचलेलं पाणी कमी करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबईमध्ये सकाळपासून पावसाला सुरूवात झाल्याने सखल भागात पाणी साचले आहे. तर बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.
Mumbai Monsoon 8 July Updates: मुंबईमध्ये रविवारी विश्रांती घेतलेला पाऊस आज (8 जुलै) पासून पुन्हा कोसळायला सुरूवात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात सकाळपासूनच दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी तुंबायला सुरूवात झाल्याने ठिकठिकाणी ट्राफिक आहे. तर मुंबईमध्ये वाहतूक व्यवस्था मंदावली असली तरीही तिन्ही मार्गावरील रेल्वे सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही तास मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह, कोकण, नाशिक या भागातही पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आज आज संध्याकाळी 4.18 मिनिटांनी मुंबईमध्ये मोठी भरती आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी थोडा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अनेक चाकरमान्यांना लेट मार्क लागण्याची शक्यता आहे. तर काहींनी घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे.