Maharashtra Monsoon 2019: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी; शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची ट्विटरद्वारे माहिती
कोकण आणि गोव्यातही मान्सून सक्रीय असून, उर्वरीत महाराष्ट्रातही मान्सन ठिकठिकाणी चांगलाच बरसत आहे. पावसाची ही दमदार कामगिरी येत्या शनिवारपर्यंत काम राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
Mumbai Monsoon 2019: मुंबई (Mumbai) शहर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. गेले काही दिवस मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तसेच, ठाणे (Thane), रायगड (Raigad) परिसरात कोसळणारा संततधार पाऊस, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशारा शिक्षण मंत्रालयाने गांभीर्याने घेत मुंबई ठाण्यासह कोकणातील शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार (Education Minister Ashish Shelar) यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनीही (Mumbai Police) ट्विट करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेले दोन ते तीन दिवसांपासून मान्सूनच्या पावसाने जोर धरला आहे. कोकण आणि गोव्यातही मान्सून सक्रीय असून, उर्वरीत महाराष्ट्रातही मान्सन ठिकठिकाणी चांगलाच बरसत आहे. पावसाची ही दमदार कामगिरी येत्या शनिवारपर्यंत काम राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्यानंतर मुंबई पोलिसांनीही ट्विट करुन नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'हवामान विभागाने मुंबई मध्ये दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने आज रोजी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तरी, सुरक्षित स्थळी राहण्यास विनंती'.
मुंबई पोलीस ट्विट
आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'दि.19 सप्टेंबर रोजी कोंकण ,ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.'
आशिश शेलार ट्विट
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामधील काही क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी, घाटमाथा तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, मुंबई, रायगड जिल्ह्य़ात काही ठिकाणी, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये घाटमाथा परिसरामध्ये गुरुवारी अतिवृष्टी होईल, असाही इशारा हवामान खात्याने दिला आहे. (हेही वाचा, Maharashtra Monsoon Forecast Update 2019: मुंबई, ठाणे, पालघर रायगड येथे पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता)
मुंबईत पाऊस विक्रमासमीप
मुंबईत पावसाची यंदा विक्रमी नोंद होण्याची चिन्हे आहेत. यंदाच्या मोसमातील (जून ते सप्टेंबर) या काळात पडलेल्या पावसाची नोंद ही गेल्या सत्तर वर्षांत पावसाच्या झालेल्या नोंदीच्या अगदी जवळपास पोहोचली आहे. पावसाची दमदार कामगिरी जर अशीच कायम राहिली तर येत्या एक दोन आठवड्यातच गेल्या सत्तर वर्षांतील विक्रमी पाऊस अशी या पावसाची नोंद होऊ शकते.